स्मार्ट ठाण्यात आदिवासींची वणवण; पाण्यासाठी कित्येक किलोमीटर पायपीट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे शहर ‘स्मार्ट’ व्हावे यासाठी बांधकाम व्यावसायिक, उद्योजक यांच्यावर कन्स्ट्रक्शन टीडीआरचा वर्षांव करत कोटय़वधी रुपयांच्या प्रकल्पांची एकीकडे आखणी केली जात असतानाच दुसरीकडे या शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या येऊरच्या आदिवासी पाडय़ांवर मात्र जलस्रोत आटल्याने रहिवाशांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. रखरखत्या उन्हात जंगलातून दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करायची.. वाटय़ाला येईल तेवढे मोजकेच पाणी हंडय़ात भरायचे.. शक्य होईल तेवढे दिवस हे पाणी पुरवायचे आणि संपल्यावर पुन्हा पाण्यासाठी वणवण फिरायचे.. असा संघर्ष या पाडय़ांवर सुरू आहे. मुख्य शहरात सुखवस्तू लोकवस्तींमध्ये उन्हाळ्यातदेखील पाण्याचे पाट वाहत असताना येऊरच्या आदिवासी पाडय़ांवरील नागरिकांना मात्र तब्बल आठ दिवस पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. जंगलातील पाणवठे कोरडे पडले असल्याने उन्हाळ्यात आणखी दोन महिने पाण्याशिवाय कसे जगायचे आणि घरातील गुरांना पाण्याशिवाय कसे जगवायचे, असा सवाल आदिवासी पाडय़ांवरील नागरिक विचारत आहेत.

येऊरमधील आदिवासी पाडे मुख्य शहरापासून लांब पल्ल्यावर वसलेले आहेत. शहरातील घडामोडींशी या पाडय़ावरील नागरिकांचा फारसा संबंध येत नाही. जंगलातील नैसर्गिक गोष्टींवर उपजीविका करण्यावरच त्यांचा भर असतो. मात्र यंदाच्या कडक उन्हामुळे पाण्याशिवाय दैनंदिन व्यवहार करणे त्यांनाही अशक्य झाले आहे. येऊरमधील वनीचा पाडा आणि फुपाने पाडा जंगलाच्या अगदी पायथ्याशी आहे. हे पाडे वनहद्दीत येत असल्यामुळे ठाणे महापालिकेतर्फे पाडय़ांवर पाण्याची सुविधा देण्यात आलेली नाही. या पाडय़ांवर महापालिकेतर्फे पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वन विभागाच्या परवानगीची आवश्यकता आहे, असे महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे रवींद्र खडताळे यांनी सांगितले.

२००६मध्ये तत्कालीन नगरसेविका ताई भोंडवे यांनी वनीच्या पाडय़ावर पाणी पोहोचवण्यासाठी या पाडय़ाजवळच लहान जलवाहिनीची सोय करून दिली होती. आजही या जलवाहिनीचा उपयोग होतो.

ही जलवाहिनी वनीच्या पाडय़ापर्यंत वाढवून द्यावी यासाठी कित्येक वर्षे पाडय़ावरील नागरिक प्रशासनाकडे विनवणी करत असले तरी या समस्येची दखल घेतली जात नसल्याचे पाडय़ावरील नागरिकांनी सांगितले. वनीचा पाडय़ाजवळ असलेल्या टाक्यांमध्ये आठ दिवसांनी पाणी येते. टाक्यांमध्ये येणारे पाणी पुरेसे नसल्याने अडीचशे ते तीनशे लोकसंख्या असलेल्या पाडय़ांवर पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. रखरखत्या उन्हात पाण्यासाठी टाकीजवळ रांगा लावल्या तरी पुरेसे पाणी मिळेल याची शाश्वती नागरिकांना नसते. आठ दिवसाआड पाणी मिळत असल्याने मोजकेच पाणी वापरायचे हे गेली कित्येक वर्षे करत असलो तरी यंदाच्या कडक उन्हात पाणवठेही आटले असल्याने पाण्यासाठी दुसरा स्रोतच नाही.

अपुऱ्या पाण्यामुळे प्रत्येक कुटुंबे पाणी मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याने अनेकदा पाण्यावरून घराघरात भांडण-तंटे होतात, असे सांगताना वनीच्या पाडय़ावरील साधना गुरव भावूक झाल्या होत्या.

स्वयंपाकासाठी शिळे पाणी वापरावे लागत असून कपडे धुण्यासाठी लांब जंगलातील पाणवठय़ाकडे महिलांना जावे लागते. कपडे धुण्यासाठी पहाटे लवकर गेल्यास पाणी शिल्लक असते. दुपार उलटल्यास इतरांनी वापरल्यामुळे हे पाणीदेखील संपते. यात जंगलातील पाणवठय़ावर पाणी आणण्यासाठी गेल्यास बिबटय़ांची भीती असते, असे वनीच्या पाडय़ावरील महिलांनी सांगितले.

वनहक्क कायद्यानुसार जंगलातील आदिवासींच्या मूलभूत गरजा भागवणे गरजेचे आहे. वनीचा पाडा आणि फुपाने पाडा वन विभागाच्या हद्दीत येत असल्यामुळे पाण्यापासून वंचित आहे. महापालिका आणि वन विभाग यांच्या योग्य समन्वयातून पाडय़ांवरच्या आदिवासींच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल.

– अपूर्वा आगवान, सुपरवासी फाउंडेशन

रस्त्यांचा अभाव

वनीचा पाडा आणि फुपाने पाडय़ावर जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. जंगलातील पायवाटेने नागरिक प्रवास करतात. पाडय़ावरून पाणी घेण्यासाठी जंगलातून नागरिकांना दोन ते तीन किमीचा प्रवास करावा लागतो. मैलोनमैल प्रवास करून आल्यावर केवळ दहा ते पंधरा पाण्याच्या बाटल्या भरून त्यावरच समाधान मानायचे, असा संघर्ष पाडय़ावरील लोक गेली कित्येक वर्षे करत आहेत. जंगलातून वाट तुडवत पाण्याची भांडी डोक्यावरून वाहून नेण्याशिवाय या नागरिकांकडे पर्याय नाही. कच्च्या रस्त्यामुळे वाहने जाऊ शकत नसल्याने गरज भासल्यास पाण्याचा टँकर मागवू शकत नसल्याचे येथील नागरिकांकडून सांगण्यात आले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tribal village in yeoor face acute water shortage
First published on: 19-04-2017 at 02:59 IST