कल्याण – कल्याण पश्चिमेतील गांधारी नदी पुलावर मंगळवारी सकाळी भरधाव वेगातील एक हायवा ट्रकने पडघा दिशेकडून कल्याणला येणाऱ्या रिक्षेला जोराची धडक दिली. ट्रकच्या धडकेत रिक्षेमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, रिक्षा चालक जखमी झाला. या धडकेनंतर ट्रक पुलाचा कठडा तोडून वीस फूट नदीत कोसळला.

ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत ट्रकमधून उडी मारल्याने तो थोडक्यात बचावला. मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान बापगाव येथील नीलेश वानखेडे आणि त्यांची आई मंगल वानखेडे रिक्षेने कल्याण शहरात येत होते. गांधारी पुलावर वानखेडे यांची रिक्षा येताच पुलावरून जात असलेल्या भरधाव वेगातील एका हायवा ट्रकने वानखेडे यांच्या रिक्षेला जोराची धडक दिली. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस, अग्निशमन विभागाने काढला आहे.

धडक इतकी भीषण होती की रिक्षेचा समोरील भागाचा चक्काचुरा झाला. आणि रिक्षा काही क्षण पुला कडेच्या सुरक्षित कठड्यांना घासत गेली. ट्रकमधील मंगला वानखेडे यांना ट्रकचा जोराचा धक्का बसल्याने त्या जागीच मरण पावल्या. नीलेश वानखेडे गंभीर जखमी झाले. रिक्षेला धडक देऊन हायवा ट्रक नदीचा दहा फुटाचा कठडा तोडून थेट नदीत कोसळला. ट्रक नदीत कोसळत असतानाच ट्रक चालकाने प्रसंगवधान राखून ट्रकमधून उडी मारून स्वताचा बचाव केला.

अपघात झाल्याचे समजताच पादचारी, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कल्याण डोंंबिवली पालिकेच्या अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी, वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक बडगुजर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. नदीत बुडालेल्या ट्रकचा एकही भाग पाण्याबाहेर दिसत नव्हता. अग्निशमन जवानांनी रबरी बोटी पाण्यात टाकून ट्रक पडल्याची जागा शोधली. ट्रकच्या चालक दालनात कोणी अडकले आहे का याचा तपास केला. आतमध्ये कोणीही आढळले नाही. जखमी रिक्षा चालकावर कल्याण मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अपघातात एक महिलेचा मृत्यू झाला. एक जण जखमी आहे. ट्रक कोसळताच चालकाने उडी मारली. त्यामुळे तो बचावला, असे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले. अपघात घडल्यानंतर पुलावर अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती.