कल्याण : कल्याण पूर्व कोळसेवाडी मधील एका डाॅक्टरला तीन भामट्यांनी आम्ही तुमच्या मुलाला आणि तुमच्या मित्राच्या मुलाला रेल्वे, ओ. एन.जी. सी. कंपनीत कारकुन म्हणून नोकरीला लावतो असे सांगितले. डाॅक्टरांचा विश्वास संपादन करुन भामट्यांनी एकूण १२ लाख रुपयांची रक्कम जानेवारी २०१९ पासून ते मार्च २०२० पर्यंत डाॅक्टर आणि त्यांच्या मित्रांकडून वसूल केली. त्यानंतर नोकरी नाहीच पण भामटे पैसेही परत देत नसल्याने डाॅक्टरांनी या भामट्यां विरुध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

संजय रामदास थोरात (५५, रा. शक्तीधाम सोसायटी, चित्रा, दुर्गा माता मंदिर रस्ता, कोळसेवाडी, कल्याण पूर्व) असे तक्रारदार डाॅक्टरचे नाव आहे. सुरेश आपटे (रा. वैशाली रेस्टाॅरन्ट जवळ, बबनराव कुलकर्णी मार्ग, मुलुंड पूर्व), भरत बाबुराव देशमुख (रा. ठोबरवाडी, कडाव, कर्जत), आणि अन्य एक राठोड नावाचा इसम या आरोपींनी डाॅक्टर थोरात यांची फसवणूक केली आहे. श्रा गणेश नॅचरोपॅथी सेंटर, महेश रुग्णालय जवळ, पुना लिंक रस्ता, कल्याण पूर्व येथे हा प्रकार घडला आहे.

हेही वाचा : अभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार

पोलिसांनी सांगितले, आरोपी तीन भामट्यांनी डाॅ. थोरात यांना संपर्क करुन आमची ओनएजीसी कंपनीत ओळख आहे. तेथे कारकुनाचा जागा भरायच्या आहेत. आम्ही तेथे तुमच्या मुलाला लावू शकतो. त्यासाठी काही रक्कम भरणा करावी लागेल. डाॅक्टर थोरात यांनी भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यांनी मुलगा अनिकेत याला ओनएजीसी मध्ये नोकरी लागेल या विचाराने भामट्यांना दोन लाख रुपये दिले. त्यानंतर भामट्यांनी आमची रेल्वेतही ओळख आहे असे सांगितले. डाॅ. थोरात यांचा मित्र शेलार यांच्या गणेश शेलार यास नवी दिल्लीत रेल्वेत नोकरीला लावतो अस सांगितले.

हेही वाचा : ठाणे जिल्हा कोंडीमुक्त करण्याचा पालकमंत्री शंभूराज देसाईंचा निर्धार; जिल्हा नियोजन समितीचा आढावा

विश्वासाने काम होणार असल्याने शेलार यांनी भामट्यांना १० लाख रुपये दिले. या भामट्यांनी आपणास नोकरीला लावण्याचे कसे प्रयत्न सुरू आहेत असे दाखविण्यासाठी बनावट कागदपत्र तयार केली ती फिर्यादी यांना दाखवली. साडे तीन वर्ष झाली तरी नियुक्ती पत्र मिळत नसल्याने काम होणार नसेल तर आमचे पैसे परत दया असा तगादा डाॅक्टर थोरात आणि गणेश शेलार यांनी लावला. त्यानंतर भामट्यांनी तक्रारदाराला प्रतिसाद देणे थांबविले. त्यांना उलटसुलट उत्तरे देऊ लागली. भामट्यांनी आपली फसवणूक केली आहे हे लक्षात आल्यावर डाॅ. थोरात यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.