|| आशीष धनगर
तानशेत, उंबरमाळीला अखरे स्थानकाचा दर्जा; प्रवाशांमध्ये उत्साह, तिकीट खिडक्याही सुरू:- गेली अनेक दशके उपनगरी लोकलचा थांबा असूनही रेल्वे स्थानक अशी ओळख नसलेल्या कसारा मार्गावरील तानशेत आणि उंबरमाळी या दोन रेल्वे थांब्यांना अखेर रेल्वे स्थानकाचा दर्जा मिळाला आहे. या दोन्ही रेल्वे स्थानकांवर रविवारपासून तिकीट खिडक्या सुरू करण्यात आल्या. या स्थानकांतून दररोज येथून प्रवास करणाऱ्या ४० हजारांहून अधिक प्रवाशांना फायदा होणार आहे.
गेल्या अनेक दशकांपासून रेल्वे थांबत असूनही स्थानकाचा अधिकृत दर्जा नसलेल्या तानशेत आणि उंबरमाळी परिसराची व्यथा निराळीच होती. मुंबई ते कसारा अशी उपनगरी लोकलचा या दोन ठिकाणी थांबा असतो. या मार्गावर आटगाव आणि खर्डी स्थानकांच्या दरम्यान तानशेत हे स्थानक आहे. तर, खर्डी आणि कसारा स्थानकांदरम्यान उंबरमाळी हे स्थानक आहे. लोकल सेवा सुरू झाल्यापासून या दोन्ही ठिकाणी फक्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच उपनगरीय लोकल थांबवण्यात येत असे. कालांतराने या दोन्ही ठिकाणी लोकसंख्या वाढत गेली आणि इतर प्रवासी या ठिकाणाहून प्रवास करू लागले. गाडीतून उतरण्यासाठी फलाटच नसल्याने गाडीचा वेग धिमा झाल्यावर प्रवाशांना उडय़ा मारूनच त्यातून उतरावे लागत असे. तर चढतानाही तारेवरची कसरत करावी लागत होती. दोन्ही ठिकाणी रेल्वे स्थानकच नसल्याने तेथे तिकीट खिडक्याही नव्हत्या. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी खर्डी रेल्वे स्थानक गाठावे लागे. तर, अनेकदा तिकीट नसल्याने प्रवाशांना दंडही भरावा लागे. या दोन्ही ठिकाणांना अधिकृत स्थानकाचा दर्जा मिळावा यासाठी येथील स्थानिक रहिवासी प्रयत्न करत होते. त्याला यश आले आहे. या दोन्ही रेल्वे स्थानकांमध्ये पादचारी पूल, शौचालय आणि रेल्वे पोलिसांच्या कार्यालयाची उभारणी करण्यात येत आहे.
अखेर मागणी मान्य
या मागणीनुसार काही महिन्यांपूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने या दोन्ही रेल्वे स्थानकांना अधिकृत थांब्यांचा दर्जा दिला असून तिथे विकासकामे करण्यास सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने फलाटांची उभारणी केली आहे. तर, रविवारी या दोन्ही स्थानकांत तिकीट खिडक्या सुरू करण्यात आल्या असून आता उपनगरीय लोकलसोबतच एक्स्प्रेस गाडय़ांची अनारक्षित तिकिटेही प्रवाशांना मिळणार आहेत. त्यामुळे या परिसरात आता आनंदाचे वातावरण पसरले आहे. या स्थानकातील पहिले तिकीट शिरोळ येथे राहणाऱ्या प्रकाश पवार यांनी काढले.
गेल्या अनेक वर्षांपासून तनशेत आणि उंबरमाळी भागात रेल्वे स्थानके उभारण्यात यावीत यासाठी रेल्वे प्रशासनाकडे मागणी करत होतो. रेल्वे प्रशासनाने या थांब्यांना अधिकृत स्थानकांचा दर्जा दिला असून आता तेथे विकासकामे सुरू केली आहेत. त्यामुळे या भागांचा विकास होण्यास मदत होईल. – राजेश घनघाव, अध्यक्ष कल्याण-कर्जत-कसारा रेल्वे प्रवासी संघटना