कल्याण – मध्य रेल्वेच्या टिटवाळा-खडवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान बुधवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान खडवली रेल्वे स्थानक परिसरातील झोपडपट्टीतून अज्ञातांनी कसारा लोकलच्या दिशेने दगड फिरकावला. हा दगड लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या दोन प्रवाशांना लागला. एका प्रवाशाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दोघांंवर तातडीने खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.

कल्याण लोहमार्ग पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. छत्रपती शिवाजी टर्मिनसहून निघालेली कसारा लोकल बुधवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान टिटवाळा ते खडवली रेल्व स्थानकांच्या दरम्यान धावत होती. खडवली रेल्वे स्थानक येण्यापूर्वीच रेल्वे मार्गाच्या बाजुला असलेल्या झोपडपट्टीतून अज्ञातांनी प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या कसारा लोकलच्या दिशेने अचानक दगड फिरकावला. लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या दोन प्रवाशांना दगड लागला. एका प्रवाशाचा डोक्याला दुखापत झाली आहे.

हेही वाचा – अनंतराव थोपटेंचा ‘हात’ सर्वांनाच का हवाहवासा?

ही माहिती तातडीने कल्याण लोहमार्ग पोलिसांना देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्यासह पोलीस पथक खडवली रेल्वे स्थानकात दाखल झाले. त्यांनी रेल्वे स्थानक परिसरात तातडीने शोध घेऊन आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. आरोपी आढळून आले नाहीत. पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून आता आरोपींचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा – डोंबिवलीतील फडके रोडवरील पाळणाघरात केंद्र चालकांकडून लहान मुलीचा छळ

हेही वाचा – मोहिते-पाटलांच्या घराण्यात उमेदवारी नाकारण्याचा ५२ वर्षांतील दुसरा प्रसंग

जखमी झालेल्या प्रवाशांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिसांनी स्वत:हून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यापूर्वी आंबिवली, शहाड परिसरात अशा दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. अनेक घटनांमध्ये लहान मुले रेल्वे मार्गात लगत खेळत असतात. खेळताना ती बाजुने जात असलेल्या लोकलवर दगड फेकीत असल्याचे यापूर्वीच्या घटनांवरून उघडकीला आले आहे.