डोंबिवली – डोंबिवली परिसरातील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून त्यांना शेअरमध्ये वाढीव नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार मागील काही महिन्यांपासून सुरू आहेत. डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात दोन सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांनी तक्रारी करून आपली शेअर गुंतवणुकीच्या माध्यमातून अनुक्रमे दोन कोटी एक लाख ९२ हजार आणि दोन कोटी ८५ लाख रूपयांंची फसवणूक झाल्याची तक्रार विष्णुनगर पोलीस ठाण्यात केली आहे.

डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगर परिसरात चंद्रकांत दत्ताराम सरवटे (६३) हे ज्येष्ठ नागरिक कुटुंबीयांसह राहतात. ते सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी आहेत. एप्रिल २०२५ ते जून २०२५ या कालावधीत त्यांची शेअर गुंतवणुकीच्या माध्यमातून फसवणूक झाली आहे. अमेरिकन सेंच्युरी इन्व्हेस्टमेंट कंपनी आणि अनुप्रित दागा, एस. एम. सी. ग्लोबल सिक्युरिटी कंपनी यांनी संगनमत करून ही फसवणूक केली आहे, असे तक्रारदार सरवटे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

सरवटे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की एप्रिल महिन्यात गुन्हा दाखल कंपनीतील इसमांनी आपणास आपल्या मोबाईलवर संपर्क साधला. आपण शेअर बाजारात गुंतवणूक केली तर आपणास अधिकचा नफा मिळेल असे आश्वासन दिले. अमेरिकन सेंच्युरी इन्व्हेस्टमेंट कंपनी आणि अनुप्रित दागा एस. एम. सी ग्लोबल सिक्युरिट कंपनीतून आपण बोलतो असे हे इसम आपणास सांगत होते. आपणास शेअर गुंतवणुकीतील ऑनलाईन माध्यमातील माहिती संबंधितांनी दिली. शेअर गुंतवणुकीतून अल्प कालावधीत अधिकचा नफा मिळतो म्हणून आपण गुन्हा दाखल इसम सांगतील त्याप्रमाणे आपल्या स्वताच्या आणि पत्नीच्या बँक खात्यांमधून इसमांना ऑनलाईन माध्यमातून टप्प्याने त्यांनी दिलेल्या बँँक खात्यावर रक्कम पाठवली.

२८ एप्रिल २०२५ ते २६ जून २०२५ या कालावधीत आपण एकूण दोन कोटी ८५ लाख रूपये दोन्ही शेअर कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. इसमांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आपण त्यांच्याकडे अधिकचा नफा मागण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्यांनी विविध कारणे देऊन रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. आठ वेगवेगळ्या मोबाईल फोनवरून इसम आपल्या संपर्कात होते. आपण त्यांना वाढीव नफ्यासह मूळ रक्कम परत करण्याचा तगादा लावला. सततची मागणी करूनही इसमांंनी रक्कम परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यावर सरवटे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज कला. या गुन्ह्याचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोंबिवली पश्चिमेतील दुसऱ्या एका प्रकरणात, आनंदनगर भागात राहणाऱ्या बिस्वजित अनिल बिस्वास (६३) या सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची शेअरमधील ऑनलाईन गुंतवणूक माध्यमातून दोन कोटी एक लाख ९२ हजार रूपयांची फसवणूक झाली आहे. आराध्ये शर्मा आणि इतरांनी ही फसवणूक केली आहे, असे बिस्वास यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे. एप्रिल ते मे या कालावधीत इसमांनी आपणास शेअर गुंतवणुकीत अधिकचा नफा मिळेल सांगून फसवणूक केली आहे, असे बिस्वास यांनी तक्रारीत म्हटले आहे. उपनिरीक्षक गवारे तपास करत आहेत.