वसईत स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे वाचवण्यात यश
सेल्फी काढण्याच्या नादात एका तरुणीसह तिला वाचविणाऱ्याचाही जीव गेल्याची मुंबईतील घटना ताजी असली तरी धोक्याच्या ठिकाणी सेल्फी काढण्याची हौस काही कमी झालेली नाही. भाईंदर येथील जेसल पार्क चौपाटीवर सेल्फीच्या नादात दोन तरुण वसई खाडीत पडले. मात्र, पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे त्यांना वाचविण्यात यश आले.
अजयकुमार चक्रधारी सिंह व संदीप ऊर्फ बबलू राजभर पाल हे दोघे जण शुक्रवारी सायंकाळी भाईंदर पूर्वेकडील जेसल पार्क चौपाटीवर फिरायला गेले होते. या वेळी वसई खाडीला भरती असल्याने दोघांनाही भरतीच्या पाण्यासह सेल्फी फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. चौपाटीवर असलेल्या गणेश विसर्जन घाटानजीकच्या सिमेंट काँक्रीटच्या चौथऱ्यावर चढून भरतीच्या पाण्याच्या साक्षीने दोघे फोटो काढू लागले. फोटो काढताना यातील एक जण अनवधानाने मागे सरकला व तोल जाऊन खाडीच्या पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्यानेही पाण्यात उडी घेतली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. ही घटना जवळच असलेल्या मीरा भाईंदर महापालिकेच्या उद्यानाच्या रखवालदाराने पाहिली. त्याने तातडीने धावत जाऊन जवळच्या बीट चौकीत कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार बेलदार, दाभाडे, बगड, विशे यांना माहिती दिली. सर्वानी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्यांना वाचविले.