उल्हासनगरः उल्हासनगरात महापालिकेच्या खड्डेभरणी मोहिमेवरून सत्ताधारी भाजप आणि टीम ओमी कलानी यांच्यात ‘कुणामुळे काम सुरू झालं?’ हा श्रेयवाद रंगला आहे. समाज माध्यमांवर यावरून आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पडत असतानाच उल्हासनगर महापालिकेने याबाबतची माहिती सादर करताना जीपीएस तंत्राद्वारे काढलेले फोटो जाहीर केले आहेत. यातील अनेक फोटो नेत्यांच्या मागणीपूर्वीचे आहेत. त्यामुळे श्रेयवादाच्या केविलवाण्या प्रकारावर शहरातून टीका होते आहे.
उल्हासनगर शहरातील खड्ड्यांचा प्रश्न जून महिन्यापासून गंभीर बनला होता. शहरातील नागरिक, माध्यमे, रीलस्टार, समाज माध्यमांवर विविध प्रकारे खड्ड्यांबाबत माहिती देत होते. अपघात, कोंडी, रिक्षा चालकांचा व्यवसाय यावरून काही रॅप गाणी शहरात चर्चेत होती. त्यात उशिराने स्थानिक लोकप्रतिनिधींनी उडी घेतली. दरम्यान, टीम ओमी कलानीने ‘शर्म करो – खड्डे भरो’ मोहिम राबवून भाजप आमदार कुमार आयलानी यांच्यावर थेट निशाणा साधला.
त्यावर प्रत्युत्तरादाखल ११ ऑगस्ट रोजी आमदार आयलानी यांनी “सात दिवसात खड्डे न भरल्यास आंदोलन” असा इशारा सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे दिला. मात्र उल्हासनगर महापालिकेने स्थानिक आमदारांच्या इशाऱ्यानंतर शहरात सुरू असलेल्या खड्डे भरण्याच्या प्रक्रियेची माहितीच सादर केली. महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली २ ऑगस्ट २०२५ पासून शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम सुरू झाली. त्यापूर्वी १४ जुलैपासूनच खड्डे बुजविण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे आणि त्यासाठी लेखी आदेशही निघाल्याचे पालिका सूत्रांनी स्पष्ट केले आहे. पावसामुळे आणि कायदेशीर निविदा प्रक्रियेमुळे कामाला उशीर झाला, पण मास्टिंग डांबर तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभागनिहाय खड्डे भरण्यास आंदोलने आणि इशाऱ्यापूर्वीच सुरूवात झाल्याचे पालिका सुत्रांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे महापालिकेने १२ ऑगस्टला जीपीएस प्रणालीतून टिपलेले खड्डे भरण्याचे फोटो प्रसिद्ध करत हे काम आधीपासूनच सुरू असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे खड्डे भरल्याचे श्रेय घेणाऱ्यांचे मनसुबे धुळीस मिळाल्याचे बोलले जाते आहे.
पालिकेने जाहीर केलेल्या माहितीनंतर शहरात समाज माध्यमांवर श्रेयवादासाठी पुढे येणाऱ्या लोकप्रतिनिधींवर टीका केली जाते आहे. खड्डे जूनपासून होते तर इशारा देण्यासाठी ऑगस्ट महिना का उजाडावा लागला, असा प्रश्न आता स्थानिक आमदारांना समाजमाध्यमांवर विचारला जात आहे. तर खड्डे बुजत आहेत हे आमच्यासाठी महत्वाचे आहे, अशी प्रतिक्रियाही समाज माध्यमांवर नागरिक देत आहेत. पालिका निवडणुकांच्या तोंडावर लोकप्रतिनिधींची सुरू असलेली हातघाई शहरात चर्चेचा विषय ठरते आहे.