डोंबिवली- येथील एका ज्येष्ठ शिवसैनिकाची उल्हासनगर मधील पती-पत्नीच्या जोडप्याने गुंतवणुकीच्या नावाखाली २२ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. मागील तीन वर्षाच्या कालावधीत गुंतविलेल्या ठेव रकमेवर या दाम्पत्याने एक पैसाही दिलेला नाही. त्यामुळे आपली फसवणूक या दाम्पत्याने केल्याने शिवसैनिकाने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हेही वाचा >>> ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी कर्नाटक विजयानंतर केला जल्लोष

प्रकाश शांताराम माने (५५, रा. सुवर्ण सोसायटी, सुयोग हॉटेल जवळ, डोंबिवली पूर्व) असे तक्रारदार शिवसैनिकाचे नाव आहे. ते शिंदे समर्थक शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील मानपाडा रस्त्यावरील मध्यवर्ति शिवसेना कार्यालयाचे ते आस्थापना प्रमुख आहेत. त्यांची फसवणूक झाल्याने खळबळ उडाली आहे. हितेश साधुराम पंजाबी (४७), पूजा हितेश पंजाबी (४५, रा. शिवलिला सोसायटी, लासी हाॅलसमोर, हेमराज डेअरी जवळ, उल्हासनगर-१) अशी आरोपी जोडप्याची नावे आहेत.

२०१९ ते मे २०२३ या कालावधीत ही फसवणूक झाली आहे. पोलिसांनी सांगितले, तीन वर्षापूर्वी उल्हासनगर मधील हितेश आणि त्यांची पत्नी पूजा पंजाबी यांनी शिवसैनिक प्रकाश माने यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी प्रकाश माने यांना आम्ही जिन्स कारखान्यामध्ये काही पैसे गुंतवणूक करत आहोत. या गुंतवणुकीत तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हालाही आकर्षक परतावा मिळेल. या दाम्पत्याच्या गुंतवणूक योजना आणि त्यांच्यावर विश्वास ठेऊन प्रकाश यांनी या योजनेत गुंतवणुकीचा निर्णय घेतला. एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर प्रत्येक ३५ दिवसांनी ५० हजार रुपये असा पंजाबी दाम्पत्याचा गुंतवणूक आराखडा होता. माने यांनी या योजनेत रोख स्वरुपात एकूण २२ लाख रुपये गुंतविले.

हेही वाचा >>> वाढत्या तापमानासह दमटपणाने ठाणेकर घामाघूम; तापमान चाळीशीआत, पण दमटपणा चाळीशीपार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुंतवणुकीनंतर माने यांना दर महिन्याला ठराविक परतावा मिळणे अपेक्षित होते. पंजाबी दाम्पत्याने वेळोवेळी खोटी कारणे देऊन आकर्षक व्याज देण्यास माने यांना टाळाटाळ सुरू केली. मागील तीन वर्षापासून हा प्रकार सुरू होता. आकर्षक व्याज मिळत नसल्याने शिवसैनिक माने यांनी मुद्दल रक्कम परत करण्यासाठी पंजाबी दाम्पत्याकडे तगादा लावला. ती रक्कम परत करण्यास भुरटे दाम्पत्य टाळाटाळ करू लागले. व्याजा बरोबर मूळ रक्कम परत मिळत नसल्याने हितेश, पूजा दाम्पत्य आपली फसवणूक करत आहे याची खात्री झाल्याने प्रकाश माने यांनी रामनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुध्द तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक के. व्ही. हासगुळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.