अवघी १४ टक्के वसुली; अंबरनाथ ९१, तर बदलापूरमध्ये ५४ टक्के वसुली

उल्हासनगर : मालमत्ता कराची थकबाकी थेट ५४२ कोटींवर पोहोचलेल्या उल्हासनगर महापालिकेने अभय योजना जाहीर करत करवसुलीसाठी नागरिकांना सूट देऊ  केली होती. त्यानंतरही उल्हासनगर महापालिकेला अवघी १४ टक्के करवसुली करणे शक्य झाले आहे. तसेच अंबरनाथ नगरपालिकेला ९१ टक्के मालमत्ता करवसुली करण्यात यश आले आहे, तर कुळगाव-बदलापूर नगरपालिकाही यंदा करवसुलीत मागे पडली असून येथे अवघी ५४ टक्के वसुली झाली आहे.

करवसुलीच्या बाबतीत प्रत्येक वर्षी थकबाकीचे नवनवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या उल्हासनगर महापालिकेने यंदा अवघी १४ टक्के मालमत्ता कराची वसुली केली आहे. यापूर्वीच्या मालमत्ता कराच्या वसुलीचा हा निचांक मानला जातो. यंदाच्या वर्षांत पालिकेने ५४२ कोटी रुपये मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी अभय योजना लागू केली होती. मात्र अभय योजनेनंतरही पालिकेला अवघी ७० कोटी ३० लाख रुपयांची वसुली करता आली आहे. गेल्या वर्षांत ७७ कोटींची वसुली करता आली होती. त्यामुळे गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा ७ कोटींची अधिकची तूट करवसुलीत आल्याचे कर विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

शहरात एकूण एक लाख ८० हजार मालमत्ताधारक असून त्यातील सुमारे ९१ टक्के मालमत्ताधारक थकबाकीधारक आहेत. करोनाचा प्रभाव आणि व्यापारी शहर असलेल्या उल्हासनगर शहरातील बहुतांश मालमत्ताधारकांना टाळेबंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे करवसुली थंडावल्याची कबुली कर विभागातर्फे देण्यात आली आहे. कुळगाव-बदलापूर नगरपालिकेलाही यंदाच्या वर्षांत करवसुलीत फटका बसला आहे. गेल्या वर्षांत  ७१ टक्के वसुली करणाऱ्या पालिकेला यंदाच्या वर्षांत अवघा ५४.५३ टक्के मालमत्ता कर वसूल करता आला आहे. बदलापूर शहरात एक लाख २१ हजार मालमत्ताधारक आहेत. यंदाच्या वर्षांत ३१ मार्चपर्यंत १७ कोटी ४९ लाख रुपये कर वसूल करण्यात पालिका प्रशासनाला यश आल्याची माहिती कर विभागातर्फे देण्यात आली आहे.

करोनाचे संकट असतानाही अंबरनाथ नगरपालिकेने  यंदाही ९० टक्कय़ांची करवसुलीची सीमा ओलांडली आहे. यंदाही पालिकेने ३६ कोटी रुपयांची करवसुली केली आहे. अंबरनाथ शहरात ८४ हजार ३०० मालमत्ता असून त्यात औद्योगिक क्षेत्रातील एक हजार ६०० मालमत्तांचा समावेश आहे. औद्योगिक मालमत्तांपोटी पालिकेला यंदाच्या वर्षांत १६ कोटींचा कर मिळाला आहे. त्यामुळे पालिकेची करवसुलीची टक्केवारी करोना काळातही शाबूत राहिल्याचे कळते आहे.

करोना, निवडणूक कार्यक्रमांमुळे करवसुली थंडावली

उल्हासनगर महापालिकेकडून मालमत्ताधारकांना मालमत्ता करांची देयके देण्यास उशिर झाल्याने आणि करोना नियंत्रणासाठी अधिकचा कर्मचारी लावल्याने करवसुली थंडावल्याचे बोलले जात आहे, तर अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पालिका निवडणुकांच्या कार्यक्रमासाठी कर्मचारी वळते केल्याने करवसुली थंडावल्याचे बोलले जात आहे. बदलापूर शहराच्या करवसुलीला या निवडणूक कार्यक्रमांचा मोठा फटका बसला आहे.