उल्हासनगरः इंस्टाग्रामवर रिल किंवा युट्युबवर शॉर्ट्स व्हिडीओ पाहून एखाद्या व्हॉट्सॲप समुहात सहभागी होत शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. यात काहींना आर्थिक लाभ होतो. मात्र या प्रकरणात फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अशाच एका प्रकरणात उल्हासनगरातील ३१ वर्षीय व्यक्तीची तब्बल १३ लाख रूपयांची फुसवणूक झाली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचा कल वाढला आहे. ऑनलाईन माध्यमातून विविध ऍपच्या माध्यमातून अनेक जण गुंतवणूक करतात. त्यात समाज माध्यमांवर कोणत्या कंपनीचे किती शेअर विकत घ्यावेत यापासून इंट्राडे ट्रेंडींगचेही सल्ला दिले जातात. त्यासाठी अनेक गुंतवणूक तज्ज्ञ व्हाट्सअप, टेलिग्रामचे समुह तयार करून त्यात दररोज सकाळच्या सुमारास सदस्यांना सल्ले देत असतात. अशा काही सल्ल्यांमुळे फायदा झालेल्या लाभार्थ्यांचे व्हिडीओही शेअर केले जातात. त्यात कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय हा सल्ला दिला जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे गुंतवणुकादारांना त्या समुहांबद्दल विश्वास निर्माण होतो. मात्र याच समुहांच्या माध्यमातून गुंतवणुकीचा सल्ला देत मोठा परतावा देण्याचे अमिष दाखवत उल्हासनगरात एका व्यक्तीला १३ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प एक भागात राहणारे भावेश मुलचंदाणी सी०७ ३६००एनई या व्हॉट्सॲप समुहात होते. त्यातीलआरोही पाटील नाव असलेल्या मोबाईक क्रमांक ९००५८४६३६६ वरून अनोळखी व्यक्तीने शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे अमिष दाखवले. त्यानंतर त्या व्यक्तीने ३६० एचएनडब्ल्यू नावाचे ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. या अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून फिर्यादी यांनी वेगवेगळया बँक खात्यात एकुण १३ लाख ७८ हजार रुपये पाठवले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वीही अनेक प्रकरणात फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. उल्हासनगरात एका प्रकरणात एका महिलेची ३४ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले होते. तर बदलापुरात एक शिक्षिका तर एक गृहिणीची लाखो रूपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण पोलीस ठाण्यात नोंदवले गेले होते. त्यामुळे अशा व्यवहारात सतर्कता बाळगावी असे आवाहन पोलिसांकडून केले जाते आहे.
‘एक का डबल’ फसवेच
व्यवहारांमध्ये कोणतीही संस्था नियमबाह्य पद्धतीने अधिकचा परतावा देऊ शकत नाही. असा परतावा देण्याचे अमिष कुणी दाखवत असेल तर असे स्त्रोत तपासण्याची गरज गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात. पोलिसांनीही वारंवार नागरिकांना गुंतवणूक करताना विश्वासार्ह स्त्रोत तपासून, त्याची खातरजमा केल्याशिवाय गुंतवणूक न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र असे गुन्हे समोर येत असतानाही सातत्याने फसव्या अमिषांना बळी पडत नागरिक गुंतवणूक करत असल्याचे चिंता व्यक्त होते आहे.