उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेने तब्बल १ हजार ६५१ चौरस मीटर क्षेत्रफळातील खड्डे बुजवून रखडलेल्या रस्ते दुरुस्ती मोहिमेला गती दिली आहे. अनेक महिन्यांपासून शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. स्थानिक आमदार कुमार आयलानी तसेच टीम ओमी कलानी यांच्या वतीने या विषयावर सातत्याने टीका होत होती आणि तातडीने काम हाती घेण्याची मागणी करण्यात येत होती. आमदार कुमार आयलानी यांनी पालिका आयुक्तांना सात दिवसांची मुदत दिली होती. त्यामुळे पालिकेने शहरात खड्डे भरण्याच्या मोहिमेची माहिती जाहीर केली आहे.
उल्हासनगर शहरात रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. शहरात वाढलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. दररोज अनेक लहान मोठे अपघात होत असून याच अपघातावर बोट ठेवत स्थानिक आमदार कुमार आयलानी यांनी उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांना सात दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतरही शहरातील खड्डे न भरले गेल्यास पालिकेच्या मुख्यालयाबाहेर आंदोलनाचा इशाराही दिला होता. शहरातील खड्ड्यांवरून समाज माध्यमांवर टीका होत असून पालिकेचे धिंडवडे काढले जात आहेत. शहरात टीम ओमी कलानीच्या वतीने समाज माध्यमावर शर्म करो गड्डे भरो ही मोहीमही सुरू केली होती.
सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून आणि नागरिकांकडून संताप व्यक्त होत असतानाच उल्हासनगर महापालिका प्रशासनाने शहरात सुरू असलेल्या खड्ड्यांबाबत माहिती जाहीर केली आहे. महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात खड्डे बुजवण्यासाठी अत्याधुनिक मॅस्टिक अस्फाल्टचा वापर केला जात आहे. हा डांबर प्रकार २०० डिग्री सेल्सियस तापमानावर गरम करून रस्त्यावर टाकण्यात येते. त्यावर चार-चार थर प्लॅस्टिक कोटिंग टाकण्यात येते. यामुळे रस्त्यांचा टिकाऊपणा वाढेल आणि पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता कमी होईल, असा दावा पालिका प्रशासनाचा आहे.
प्रभागनिहाय खड्डे भरण्याची कामगिरी
उल्हासनगर प्रभाग समिती क्र. ४ आणि ५ मध्ये एकूण १३ ठिकाणी २०६ चौ.मी. क्षेत्रफळातील खड्डे बुजवले गेले आहेत. यात व्हिनस चौक ते लाल चक्की चौक, गांधी रोड, गुरु नानक स्कूल परिसर, हरिओम बेकरी ते चांदवणी चौक आदी ठिकाणांचा समावेश आहे.
प्रभाग समिती क्र. १, २ आणि ३ मध्ये १६ ठिकाणी ६८३ चौ.मी. क्षेत्रफळातील खड्डे बुजवले गेले आहेत. यामध्ये भंगार गली, नायरा पंप मागील बाजू, जय सधवाणी चौक, कुर्ला कॅम्प रोड, कामगार हॉस्पिटल आदी महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश आहे.
तर इतर वेगळ्या पद्धतीने ३ ठिकाणी ७६२ चौ.मी. क्षेत्रफळातील रस्त्यांचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. ज्यात कोनार्क रेसिडन्सी ते गुरुद्वारा रोड आणि गांधी रोडवरील अबू हॉटेल ते जॅकी पॅलेस या भागाचा समावेश आहे. गणेशोत्सव आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या कामांना गती देण्यात आली असून, मुख्य रस्ते, चौक, बसथांबे, पादचारी मार्ग आणि बाजारपेठांमधील रस्ते दुरुस्त केले जात आहेत, अशी माहिती पालिकेने दिली आहे.
नागरिकांना दिलासा
शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी या तक्रारींमुळे दबावाखाली आलेल्या महापालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे. काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. पालिकेने शहरातील उड्डाणपूल, महत्त्वाचे रस्ते यांचे खड्डे भरल्याची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत.