साई पक्षाच्या दोन उमेदवारांवर बलात्काराचा गुन्हा

उल्हासनगर शहरातील राजकारणात विरोधी पक्षांना नामोहरम करण्यासाठी भाजपकडून सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप साई पक्षाचे अध्यक्ष जीवन इदनानी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. निवडणूक काळात साई पक्षाच्या दोन उमेदवारांवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या पाश्र्वभूमीवर इदनानी यांनी हे आरोप केले आहेत.

उल्हासनगर शहरातील राजकारण एक वेगळ्या टप्प्यावर येऊ न पोहोचले असून त्यातून शत्रूला मित्र करून घेत विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजप आणि टीम ओमी कलानी करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. गेल्या दहा दिवसांत दोन उमेदवारांवर बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. खोटय़ा आरोपांद्वारे हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत  विरोधी पक्षांना बदनाम करण्याचे कारस्थान भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चालविले आहे, असा आरोप साई पक्षाचे जीवन इदनानी यांनी केला आहे.

साई पक्षाचे उमेदवार सुभाष मनसुलकर आणि धर्मेंद्र ऊर्फ बाबु गुप्ता यांच्यावर नुकताच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांना कधीही अटक होऊ  शकते अशी चिन्हे आहेत. यातील सुभाष मनसुलकर हे पूर्वी शिवसेनेचे गटनेते होते. मात्र बलात्काराच्या गुन्ह्य़ामुळे त्यांना शिवसेनेने तिकीट नाकारले. त्यामुळे अचानक निवडणुकीच्या तोंडावर हे गुन्हे दाखल केले जात असून त्यासाठी भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे, असा आरोपही इदनानी यांनी यावेळी केला. शहरात काही दिवसांपासून अशांततेचे वातावरण निर्माण केले जात असून आच्यासारखे छोटे पक्ष वाढत असून स्वच्छ प्रतिमेच्या पक्षांची ताकद वाढत असल्याचे पाहून सत्ताधारी पक्षात भीतीचे वातावरण आहे.

यातूनच बदनामी करून दबाव निर्माण करण्याचा डाव भाजपकडून होत असल्याचा आरोप इदनानी यांनी केला आहे. गुन्हे दाखल करून तडीपारीची धमकीही दिली जात असून याकडे पोलिसांनीही लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अन्यथा शहरात पुन्हा चुकीचा पायंडा पडेल असे मत त्यांनी व्यक्त केले. याबाबत निवडणूक आयोगालाही माहिती देण्यात आली असून त्यांनीही याकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.