उल्हासनगरः शेअर बाजारात गुंतवणुकीतून अधिकच्या परताव्याचा मोह उल्हासनगरात एका महिलेला महागात पडला आहे. ऑनलाईन शेअर खरेदी करण्यासाठी एका ऍपच्या माध्यमातून महिलेने तब्बल ३१ लाख २७ हजार रूपयांची गुंतवणूक केली. मात्र ते पैसे परत मिळवण्यासाठी आणखी १० लाख देण्याची मागणी आरोपीने केली. त्यानंतर या गुंतवणुकीतील सत्य समोर आले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलापुरात दोनच दिवसांपूर्वी अशाच प्रकारची फसवणूक झाल्याचे समोर आले होते.
गेल्या काही वर्षात ऑनलाईन गुंतवणुकीच्या जाळ्यात अनेक व्यक्ती अडकताना दिसत आहेत. ऑनलाईन फसवणुकीबाबत असलेले अज्ञान, अतिरिक्त परताव्याचा मोह, कमी कालावधीत पैसे दुप्पट करून मिळण्याचे आश्वासन आणि सहज ऑनलाईन माध्यमातून मोबाईलवरूनच गुंतवणूक करण्यास भाग पाडले जात असल्याने हे प्रकार वाढले आहेत. अधिकृत जाहीर परताव्याच्या दरापेक्षा अधिकच्या परताव्याच्या मोहात अनेकांचे लाखो रूपये बुडाले आहेत. गेल्या काही वर्षात बदलापूर आणि अंबरनाथसारख्या नोकरदार वर्गाच्या शहरातही उच्च शिक्षितांमध्ये अशा फसवणुक झालेल्यांची संख्या अधिक आहे.
बदलापुरात दोनच दिवसांपूर्वी दोन महिन्यात गुंतवणुक दुप्पट करण्याच्या मोहात एका महिलेला तब्बल ३५ लाखांचा गंडा घालण्यात आल्याचे समोर आले. तर आता उल्हासनगरात एका महिलेला अशाच ऑनलाईन गुंतवणुकीच्या मोहात अडकवून ३१ लाखांचा गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे. एका अज्ञात व्यक्तीने व्हाट्सपवरून या महिलेला संपर्क साधला. त्यानंतर त्यांना एका लिंक मोबाईलवर पाठवत त्यावर शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले. महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी आपणच या ऍपचा मेनेजर असल्याचे सांगत त्या आरोपीने महिलेचा विश्वास संपादन केला. पुढे या चोराने महिलेला वेळोवेळी आपल्या विविध बॅंक खात्यातून एकूण ३१ लाख २७ हजार रूपये गुंतवण्यास भाग पाडले. आपले गुंतवणूक केलेले पैसे महिलेने परत मागितले असता ती देण्यास आरोपीने टाळाटाळ केली. गुंतवणूक केलेली रक्कम हवी असल्यास १० लाख रूपयांचे अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल असे त्या आरोपीने महिलेला सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने उल्हासनगर पोलिसांकडे धाव घेतली. महिलेने या प्रकरणी उल्हासनगर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सातत्याने अशा फसवणुकीचे प्रकार समोर येऊनही नागरिक मोठ्या संख्येने अशा अविश्वासार्ह प्रकारात पैसे गुंतवत असल्याने फसवणुक होतेेच आहे. याप्रकरणी नागरिकांनी संतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.