scorecardresearch

Premium

‘त्या’ पुलामुळे पूर!

खाडी बुजवून एक पूल उभारला जातो तरी सर्व शासकीय यंत्रणा गप्प बसल्या होत्या.

राजावली खाडीवर बांधण्यात आलेला पूल अखेर महापालिकेने जमीनदोस्त केला.
राजावली खाडीवर बांधण्यात आलेला पूल अखेर महापालिकेने जमीनदोस्त केला.

राजावली खाडीवरील अनधिकृत पूल महापालिकेकडून अखेर जमीनदोस्त

वसई: वसई-विरार शहरात महापूर येण्याच्या कारणांचा शोध तज्ज्ञांमार्फत घेतला जात असताना राजावली खाडीतील एका अनधिकृत पुलामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेने हा पूल तोडला तेव्हा कुठे शहरातील पाणी ओसरले. मात्र हा पूल कोणी बांधला याबाबत कुणालाच माहिती नाही. प्रशासकीय पातळीवर त्याची नोंदही नसून सर्वच शासकीय यंत्रणांनी हात वर केले आहेत.

PM Narendra Modi
”नव्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलासाठी ८०० कोटी मंजूर”, मोदी म्हणाले, ”नवीन संसद भवनाप्रमाणे…”
five bangladeshi nationals arrested in nigdi with indian passports
थंडी सहन न झाल्याने युवकाने केलं भलतंच कृत्य; पोलिसांकडून अटक
Mumbai Highcourt
“मग मुंबईचे रस्ते बंद करावेत का?”, कर्मचाऱ्यांना मराठा आरक्षण सर्वेक्षणात जुंपल्याने HC ने मुंबई पालिकेला फटकारले
Nitin Gadkari Car
नितीन गडकरींच्या कार कलेक्शनमधील ‘ही’ कार आहे खास; धुराऐवजी पाणी सोडणाऱ्या गाडीची वैशिष्ट्ये अन् फायदे काय?

मुसळधार पावसामुळे यंदा वसईकरांना महापुराचा भयानक अनुभव आला. या पूरस्थितीला जबाबदार असलेल्या गोष्टी एकामागोमाग एक समोर येऊ लागल्या आहेत. नायगाव पूर्वेच्या राजावली खाडीवर असलेल्या एका पुलाने खाडीतून शहराचे पाणी जाण्याचा मार्ग बंद केला होता. खाडी ४० फूट रुंद होती. या खाडीत भराव टाकून, सिमेंटचे पाइप टाकून लोखंडी पूल उभारण्यात आला होता. त्यामुळे खाडीचे पात्र केवळ १० फूट झाले. दोन वर्षांपूर्वी हा पूल उभारला होता. हा पूल कुणी उभारला याबाबतची अधिकृत माहिती महापालिका, सार्वजनिक बांधकाम खाते आणि महसूल खाते यांच्याकडे नाही.

४ मार्च २०१६ रोजी येथील स्थानिक मीठ उत्पादक मनोज जोशी यांनी या खाडीत बेकायदा पूल बनत असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याला कळवले होते. या पुलामुळे पाणी जाण्याचा मार्ग बंद होत आहे, भरतीचे पाणी येणे बंद होऊन मीठ उत्पादकांचे नुकसान होत आहे, असे सांगत पुराचा धोका वर्तवला होता. सातत्याने पत्रव्यवहार करूनही या अनधिकृत पुलावर कारवाई झालेली नव्हती. जोशी यांनी मीठ अधीक्षक, महापालिका, जिल्हाधिकारी यांच्याकडे या पुलाबाबत तक्रारी केल्या होत्या. खाडी बुजवून एक पूल उभारला जातो तरी सर्व शासकीय यंत्रणा गप्प बसल्या होत्या. पुरानंतर शिवसेनेचे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले आणि पूल तोडण्यात आला. पूल पाडल्यानंतरच पुराच्या पाण्याचा निचरा झाला, असे शिवसेनेचे नवघर-माणिकपूर उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी सांगितले. दोन वर्षांपासून या पुलाबाबत तक्रारी करण्यात येत होत्या. वेळीच कारवाई झाली असती तर शहरात पूरस्थिती निर्माण झाली नसती असे चव्हाण यांनी सांगितले.

पूल नेमका कुणी बांधला?

मीठ उत्पादक जोशी यांनी दोन वर्षांपासून या बेकायदा पुलाबाबत सार्वजनिक बांधकाम खाते, महसूल खाते, मीठ अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम खात्याने पाहणी करूनही केवळ हा आमचा पूल नाही, असे सांगितले. पालिकेलाही या पुलाबाबत माहिती नाही. मग हा पूल कोणाचा आणि त्याला दोन वर्षे अभय का मिळाले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवसेनेचे उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी हा पूल ‘सहारा समूहा’ने आपल्या प्रकल्पासाठी उभारला होता, असा आरोप केला आहे. या भागात सहारा समूहाची जागा आहे. त्यासाठी त्यांनी हा पूल बांधला होता. आता तो पूल बांधून वसईकरांना पूरसंकटात ढकलणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

राजावली खाडीचे महत्त्व

नालासोपारा पूर्वेकडून पाणी येऊन ते रेल्वेमार्गाखालून नालासोपारा पश्चिमेला येते. तेथून वसई पश्चिमेच्या सूर्या गार्डन येथून सोपारा खाडीत जाते आणि तेथून ते राजावली खाडीमार्गे समुद्रात जाते.  नालासोपारा आणि वसई शहरातील पाणी सोपारा खाडीतून राजावली खाडीत आणि तेथून समुद्राला मिळते. भरतीच्या वेळी खाडीचे पाणी उलटे येते आणि त्यावर मीठ उत्पादन केले जाते. मात्र खाडीत पूल उभारल्याने मीठ उत्पादकांना भरतीचे खारे पाणी मिळेनासे झाले.

शहरात पूरस्थिती निर्माण होण्यासाठी अनेक कारणे होती. राजावली खाडीतील हा पूल त्यातील एक कारण आहे. माजी महापौर नारायण मानकर आणि विद्यमान उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स यांनी मला याबाबत माहिती दिली. त्यावेळी मी तात्काळ या ठिकाणी जाऊन खाडीतील सिमेंटचे पाइप काढून टाकले.

– सतीश लोखंडे, आयुक्त, महापालिका

 

 

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Unauthorized bridge on rajavali creek finally demolished by vvmc

First published on: 27-07-2018 at 00:15 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×