डोंबिवली – देश, राज्यातील समाज जीवनाशी निगडित विविध विषयांवर मागील काही वर्षापासून डोंबिवलीतील उपक्रमशील विद्यानिकेतन शाळेतर्फे शाळेच्या बसवर प्रबोधनकारी, नागरिकांना विचार करायला लावणारे फलक लावून नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. जुन्यातील तटस्थता, निर्विकारपणा पाहून युनेस्को त्या स्थळ, घटनांची योग्य दखल घेते. त्याप्रमाणे डोंबिवलीतील नागरी समस्यांच्या विषयावर मख्खपणे पाहत, निर्विकारणपणा धारण करून आपली दैनंदिन वाटचाल करणाऱ्या डोंबिवलीतील नागरिकांच्या निर्विकारपणाची युनेस्कोने दखल घ्यावी, अशी मागणी करणारा फलक विद्यानिकेतन शाळेच्या बसवर दोन दिवसापासून झळकत आहे.
काही दिवसापूर्वी राज्यात उफाळून आलेल्या शालेय शिक्षणातील हिंदी सक्तीच्या विषयावर विद्यानिकेतन शाळेने ‘माय मरो मावसी जगो’ असा फलक लावून समाजात जागृती करून शासनाच्या दिशेने काही तीर सोडले होते. हा फलक चर्चेचा विषय झाला होता.राज्यातील पुण्यानंतरची साहित्यिक, सांस्कृतिक नगरी म्हणून डोंबिवली शहर ओळखले जाते. या साहित्यिक सांस्कृतिक नगरीची अवस्था आता शेकडो वर्षाच्या गाळाने भरलेल्या डबक्या सारखी झालीय. सर्वदूर नागरी समस्यांचा चिखल पसरला आहे.
डोंंबिवली शहरात गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. चाळी, आरसीसी, लोडबेअरींगच्या इमारतीत राहणारा ४० वर्षापूर्वीचा रहिवासी गगनचुंबी इमारतींमुळे जमीन सोडून गगनाच्या दिशेने झेप घेत आहे.हाच पूर्वीचा रहिवासी डोंबिवलीतील खड्डे, कचरा, वीजेचा लपंडाव, फेरीवाले, वाहन कोंडीअशा नागरी समस्यांच्या विषयावर पेटून उठत होता. पण आता हाच रहिवासी गगनचुंबी इमारतींमुळे उंच उंच इमारतीत राहण्यास जाण्यास सुरूवात झाल्यापासून त्याला नागरी समस्यांचे काही पडलेच नाही, असे चित्र डोंबिवलीत आहे, असे शालेय फलकाच्या माध्यमातून दर्शविण्यात आले आहे.
युनेस्को नेहमीच तटस्थता, निर्विकारातील गुण मापून वारसा स्थळ, घटनेला विशेष स्थळ म्हणून जाहीर करते. त्याचप्रमाणे मानवी जीवनातील निर्विकारतेचे महत्व पटून देण्यासाठी युनेस्कोने डोंंबिवतील नागरिकांच्या निर्विकारतेची दखल घ्यावी. जेणेकरून जागतिक स्तरावर नागरी समस्यांच्या विषयावर मख्ख, तटस्थ आणि मला काही दिसतच नाही अशा भावनेतून राहिल्यावर कसा निर्विकारतेचा सन्मान मिळतो हेही जगाला कळेल, असे विद्यानिकेतन शाळेच्या फलकाच्या माध्यमातून डोंंबिवलीतील नागरिकांच्या तटस्थ, निर्विकारपणावर चिमटा घेण्यात आला आहे.
या सगळ्या समस्यांच्या विषयावर जागरूक राहून कामे करावीत तेही चित्र शासन, प्रशासनाच्या माध्यमातून दिसत नाही. प्रत्येक जण डोंबिवलीतील खाचखळगे, खड्डे, तुंबलेल्या पाण्यातून आपल्या मोबाईलमधील गप्पा, चलतचित्र, व्हाॅट्सपमध्ये गुंग राहत दैनंदिन जीवन ढकलत आहे. शहराच्या दृष्टीने हे खूप मारक आहे. पुढील पीढीला या तटस्थता, निर्विकारपणातून आपण काय संदेश देणार, असा खोचक सवाल या फलकाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे.