शास्त्रीय संगीतात पूर्णवेळ करिअर करत असलेल्या एखाद्या शहरातील कलाकारांनी एकत्र येऊन शहरातील रसिकांपुढे कार्यक्रमाची पर्वणी सादर करण्याचे प्रयोग तसे विरळाच. ठाण्यात मात्र अशा प्रकारे शास्त्रीय संगीताची रंगतदार मेजवाणी देण्याचा ‘युनिटी संगीत संमेलन’ हा अभिनव प्रयोग नुकताच रंगला. ठाणेकर कलाकारांचे हे संघटन अधिकच घट्ट होऊन एका भव्य मैदानामध्ये हा संगीताचा महोत्सव सुरू होण्याची गरज आहे, असा सूर ठाणे म्युझिक फोरम संस्थेच्या वतीने आयोजित युनिटी संगीत महोत्सवामध्ये उपस्थित मान्यवर कलाकारांनी लावला. विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमास ठाण्यातील रसिकांनी भरघोस प्रतिसाद देत संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च भागू शकेल इतकी भरघोस देणगी युनिटीच्या कलाकारांना सुपूर्द केली. ठाणेकर कलाकारांच्या युनिटीला लाभलेला हा लोकाश्रय आहे, अशी प्रतिक्रिया युनिटीचे आयोजक शशांक दाबके यांनी या वेळी व्यक्त केली.
ठाण्यातील संगीत आणि वादन क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींना एकत्र करून धनश्री लेले, अनंत जोशी आणि शशांक दाबके या मंडळींनी ‘युनिटी’ हा उपक्रम सुरू केला आहे. यंदा या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असून या निमित्ताने ठाण्यातील सहयोग मंदिरच्या सभागृहात तीनदिवसीय संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात ठाण्यातील ४५ हून अधिक गायक-वादकांनी आपली कला सादर केली.

पहिल्या दिवशी ‘ना डारो रंग’ या सत्रात होरी, ठुमरी हे उपशास्त्रीय प्रकार कलावंतांनी सादर केले. यात स्वरांगी मराठे, दीपिका भिडे, रोहित धारप या उदयोन्मुख कलाकारांबरोबरच कल्याणी साळुंके, हेमा उपासनी, विभावरी बांधवकर या प्रथितयश कलावंतांना रसिकांनी भरभरून दाद दिली. किशोर पांडे आणि अनंत जोशी यांचे अनुक्रमे एकल तबला व संवादिनी वादन पहिल्या दिवशीची शोभा वाढवणारे ठरले.