ठाणे शहरातून गेलेल्या पूर्व द्रुतगती महामार्गामुळे शहराची साधारणत: दोन भागांत विभागणी होते. एक महामार्गाच्या अलीकडे असलेले ठाणे शहर आणि दुसरे महामार्गाच्या पलीकडे औद्योगिक नगरीचे शहर. महामार्गाच्या अलीकडच्या ठाणे शहरात पूर्वीपासूनच नागरीवस्ती आणि पलीकडे औद्योगिक पट्टा अशीच शहराची रचना होती. मात्र महामार्गाच्या पल्याड वसलेल्या ठाण्यात कंपन्यांच्या पश्चात सुरवातीच्या काळात ज्या वसाहतींची पायाभरणी झाली. त्यापैकी एक म्हणजे ‘उन्नत्ती गार्डन’होय.

उन्नत्ती गार्डन
नागरीकरणाच्या ओघात पूर्व द्रुतगती महामार्गाच्या पलीकडे असलेल्या अनेक कंपन्यांनी ठाण्यातून काढता पाय घेतला. विकासकांनी कंपन्यांच्या जागी टोलेजंग वसाहती उभारण्यास सुरुवात केली. २००६ मध्ये अशाच प्रकारे शिवाईनगर परिसरात असलेल्या ‘देविदयाळ वायर इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या जागेवर सुबकआणि सुनियोजित रचना असणाऱ्या ‘उन्नत्ती गार्डन’ वसाहतीची विकासकाने पायाभरणी केली. ठाणे रेल्वे स्थानकापासून ३० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या आणि पूर्व द्रुतगती महामार्गापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर प्रभाकर कुंटे मार्ग येथे उन्नत्ती गार्डन उभी आहे. हेलेक्स, आयरिश, आलव्हिया, ऑर्चिड अशा चार इमारतींचा समावेश उन्नत्ती गार्डन वसाहतीत होतो. उन्नत्तीच्या टय़ुलिप या पाचव्या इमारतीचे काम प्रगतिपथावर असून लवकरच त्या इमारतीमधील घरांचा ताबा सदनिकाधारकांना मिळणार आहे. विविध प्रकारच्या फुलांची नावे वसाहतीतील इमारतींना देण्यात आली आहेत. फेज एक आणि फेज दोन असे दोन विभाग उन्नत्ती गार्डन संकुलात करण्यात आले आहेत. फेज एकमध्ये सातमजली हेलेक्स, तीन विंग असणारी १४ माळ्यांची आयरिश अशा दोन इमारती आहेत. तसेच फेज दोनमधील सर्वाधिक सहा विंग सातमजली ऑर्चिड इमारतीत आहेत. ५८० ते ८५० चौरस फुटांच्या ३५० सदनिका उन्नत्ती गार्डन वसाहतीत आहेत. वसाहतीत सर्व जातिधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असून मराठी टक्का सर्वाधिक आहे. अनेक वसाहतींत शहराच्या कानाकोपऱ्यातून अथवा मुंबईतून स्थलांतर करून ठाण्यात वास्तव्यास आलेले रहिवासी आढळून येतात. मात्र उन्नत्ती गार्डन वसाहतीत वर्तकनगर, शिवाईनगर, शास्त्रीनगर, किसननगर अशा जवळपासच्या परिसरातील रहिवाशांचे प्रमाण लक्षणीय आहे. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या वसाहतीत आत प्रवेश करताना इतर वसाहतींत अभावानेच आढळणारे दुभाजक, गतिरोधक आणि मध्यभागी भलामोठा वर्तुळाकार चौक आढळतो. विविध शोभेच्या झाडांनी तसेच फुलझाडांनी सजवलेल्या या चौकामुळे वसाहतीच्या दर्शनी भागाला निराळीच शोभा प्राप्त झाली आहे. २४ तास पाणीपुरवठा असल्याने वसाहतीत पर्जन्य जलसंधारण योजना अस्तित्वात नाही. सीसीटीव्ही यंत्रणा आणि सुरक्षारक्षकांची मोठी फळी यातून वसाहतीच्या सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य दिले जात असल्याचे उन्नत्तीवासीय अभिमानाने सांगतात. स्वच्छतागृहातील पाणी पुनर्प्रक्रिया करून वापरण्यासंदर्भातील यंत्रणा तांत्रिक बिघाडामुळे सध्या बंद अवस्थेत आहे. मात्र सौरऊर्जेची उपकरणे बसविल्याने वसाहतीत सकाळी चार तास गरम पाण्याचा पुरवठा होतो. उच्च क्षमतेचे जनित्र (जनरेटर) वसाहतीत असून वीज गेल्यास जास्तीतजास्त काळ त्याद्वारे मुख्य आवारातील दिवे कार्यान्वित ठेवता येतात. तसेच वसाहतीमधील अग्निशमन यंत्रणाही चांगल्या अवस्थेत कार्यान्वित आहे. वसाहतीच्या आवारात दोन उद्याने आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी असलेल्या उद्यानात विविध प्रकारची खेळणी असून दुसऱ्या हिरवळीच्या उद्यानाचा ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना फेरफटका मारण्यासाठी उपयोग होतो. मराठीभाषिक बहुसंख्य असल्याने गुढीपाडवा, होळी, गोकुळाष्टमी, दिवाळी यांसारख्या सणांसोबतच प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन आदी सण मोठय़ा उत्साहात वसाहतीत साजरे केले जातात. वसाहतीतील सभासदांमध्ये एकोपा आणि सलोखा टिकून राहावा यासाठी वर्षांतील दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. वसाहतीत सर्वच प्रकारची वृक्षराजी असून पामच्या झाडांची संख्या मात्र लक्षणीय आहे. मोठमोठय़ा वसाहतीत विभक्त कुटुंब आढळून येतात. मात्र उन्नत्ती गार्डन वसाहतीत एकत्र कुटुंबीयांची संख्या तुलनेने अधिक असल्याचे उन्नत्तीवासीयांचे म्हणणे आहे. वसाहतीत मध्यमवर्गीय तसेच उच्चमध्यमवर्गीय अशी सर्वच स्तरांतील नागरिक राहतात. होमिओपॅथिक तज्ज्ञ देवेंद्र वाणी, डॉ. स्वप्निल सुर्वे, डॉ. ज्योत्स्ना विशे आणि डॉ. रुचिरा माने यांसारखी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी उन्नत्ती गार्डनमध्ये राहतात.
सुरवातीच्या काळात १२०० ते १६०० रुपये चौरस फुटाच्या दराने खरेदी केलेल्या सदनिकांची किंमत सध्याच्या बाजारभावाप्रमाणे ७० ते ९० लाख रुपयांच्या घरात गेली आहे. प्रत्येक इमारतीची स्वतंत्र समिती असून संपूर्ण उन्नत्ती गार्डन वसाहतीची समुच्चय समिती आजतागायत अस्तित्वात नाही. त्यामुळेच वसाहतीचे महत्त्वाचे निर्णय घेताना आणि राबविताना अडचणी निर्माण होतात.

समस्यांमुळे अधोगती
’उन्नत्ती गार्डन वसाहतीची पायाभरणी करताना विकासकाने ठाणे महापालिकेसाठी दिलेल्या भल्यामोठय़ा सुविधा भूखंडावर पालिकेकडून ‘मिनी क्रीडांगण’ प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र संबंधित विभागाकडून मात्र या भूखंडाकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंत उन्नत्तीवासीयांनी व्यक्त केली.
’मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागेचा वापर सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी केला जातो. कार्यक्रम झाल्यावर मोठय़ा प्रमाणात तयार होणारा कचरा आयोजक भूखंडावर टाकून निघून जातात. त्यातून मोठय़ा प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. त्याचा नाहक त्रास उन्नत्तीवासीयांना भोगावा लागत असल्याचे रहिवासी संतोष सारंग यांनी सांगितले.
’भूखंडावर असलेल्या शौचालयाच्या टाकीतून सतत पाणी वाहत असते. टाकीच्या बाजूला असलेल्या ट्रान्सफॉर्मरला त्यामुळे धोका निर्माण होत आहे. याप्रकरणी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. यासंबंधी संबंधित विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही अद्याप त्याचा निकाल लागला नाही, ही बाब दुर्दैवी असल्याचे मत उन्नत्ती फेज दोनच्या ‘ऑर्चिड’ संकुलाचे सचिव दिनेश शिंगरे यांनी सांगितले.
’वसाहतीच्या समोर असलेला पदपथ दोन्ही बाजूने फेरीवाल्यांनी व्यापलेला असून त्यावरून चालणे जिकिरीचे बनले आहे. त्यातूनच महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला गेल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी उन्नत्ती गार्डन वसाहतीच्या प्रवेशद्वारासमोरच घडली आहे.
’वसाहतीला मुख्य प्रवेशद्वार नसल्यानेच भटक्या कुत्र्यांचा वावर आणि बाहेरील गाडय़ा उन्नत्ती गार्डनच्या आवारात उभ्या केल्या जातात.
विनित जांगळे