ठाणे आणि ठाण्यापल्याडच्या अनेक शहरांना व गावांना मुंबईशी जोडणारी व्यवस्था म्हणजे मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा! मात्र ब्रिटिश काळापासूनच केवळ या सेवेवर अवलंबून राहिल्याने आज ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, टिटवाळा, आसनगाव, बदलापूर आदी शहरांसमोर दळणवळणाचा दुसरा पर्यायच उपलब्ध नाही. या उपनगरांची सध्या अतिशय वेगाने वाढ होत असल्याने त्याचा ताण मात्र रेल्वेवरच पडत आहे.
मध्यंतरी काही वर्तमानपत्रांमध्ये एक मोठी जाहिरात आली होती. ‘रेल्वे अपघातांत ठाणे-कळवा-मुंब्रा परिसरात महिन्याला शेकडो लोक मृत्युमुखी पडतात. रेल्वेच्या या ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेविरोधातील जनआंदोलनात सहभागी व्हा..’ या जाहिरातींमागे एका राजकीय पुढाऱ्याचा हात होता, हे वेगळं सांगायला नको! ती जाहिरात वाचून काहीतरी वेगळं प्रकरण आहे हे असं वाटलं होतं. रेल्वेविरोधात जनआंदोलन म्हणजे नेमके काय, याचे प्रत्यंतर काही दिवसांतच दिवा येथील आंदोलनाने आले. आता या आंदोलनामागे त्या जाहिरातीचा वाटा किती होता, हे कधीच स्पष्ट होणार नाही. पण त्या आंदोलनानंतर मात्र काही प्रश्न निर्माण झाले.
सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की, ठाणे-कळवा-मुंब्रा यादरम्यान होणारे बहुतांश रेल्वे अपघात हे रूळ ओलांडताना होणारे आहेत. रेल्वे रूळ ओलांडणे हा रेल्वे नियमांनुसार गुन्हा आहे. तसेच धावत्या गाडीच्या दरवाज्यात उभे राहून धाडसी कृत्ये करणे हादेखील गुन्हा आहे. या सर्व स्थानकांवर मध्य रेल्वेने प्रवासी पूल बांधले असताना त्याचा वापर करण्याऐवजी सरसकट रूळ ओलांडले जातात. मग अशा वेळी रेल्वे रूळ ओलांडताना होणाऱ्या मृत्यूंची जबाबदारी रेल्वेची कशी? ठाणे ते विटावा या परिसरात सर्वाधिक रेल्वे अपघात होतात. या पट्टय़ात हजारो प्रवासी दर दिवशी बिनधास्त रेल्वे रुळांवरून चालत ठाणे स्थानक गाठत असतात. ठाणे ते विटावा यादरम्यान रेल्वेमार्गालगतच स्कायवॉक बांधण्याची घोषणा आंदोलनाची हाक देणाऱ्या राजकीय नेत्याचा पक्ष सत्तेत असताना करण्यात आली होती. मात्र, त्याबाबत अद्याप तरी काहीच ठोस घडलेले नाही. ही गोष्ट हा राजकीय नेता सोयीस्करपणे विसरलेला दिसतो.
ठाणे-दिवा या टप्प्यातील पाचव्या व सहाव्या मार्गिकेचं काम गेली अनेक वर्षे रखडलं आहे. कळवा-मुंब्रा परिसरात रेल्वेमार्गालगत रेल्वेच्याच जमिनींवर झालेल्या अतिक्रमणाचा हा परिपाक आहे. त्यातच रेल्वेकडे असलेल्या निधीची कमतरताही या कामाच्या पूर्णत्वाच्या आड येत आहे. अतिक्रमणाच्या प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधींपैकी एकानेही पुढे येत मध्यस्थी करण्याची भूमिका घेतल्याचं ऐकिवात नाही. परिणामी, सध्या असलेल्या चार मार्गिकांवरून उपनगरीय तसंच लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूक सुरू असते. या दोन मार्गिका तयार झाल्या, तर कल्याणपासून ठाण्यापर्यंत सहा मार्गिका कार्यरत होतील आणि गाडय़ांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करणं मध्य रेल्वेलाही शक्य होईल.
अलिकडच्या वर्षांत ठाण्यापुढील शहरं झपाटय़ानं वाढली आहेत, नि वाढतच आहेत. शहापूर, आसनगाव, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरांतील जमिनींचे प्लॉट पाडून तेथे वसाहती वसवल्या जात आहेत. मात्र हे सर्व सुरू असताना तिथे व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणं किंवा या भागातून मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वेला पर्यायी व्यवस्था निर्माण करणं या गोष्टींकडे कधीच लक्ष दिलं गेलं नाही. अजूनही कल्याणपुढे कर्जत आणि कसारा या दिशेने जाणाऱ्या मार्गाची संख्या दोनाची चार झालेली नाही.
भारतीय रेल्वेच्या इतिहासात ठाणे स्थानकाला प्रचंड महत्त्व आहे. किंबहुना हा इतिहास ठाणे स्थानकाशिवाय पूर्ण होऊ शकतच नाही. सुरुवातीला ठाण्याप्रमाणे धावणारी गाडी हळूहळू कल्याण आणि त्यानंतर त्याच्यापुढेही धावायला लागली. याचदरम्यान उपनगरीय रेल्वे सेवेचा विस्तारही झाला. या सर्व कालावधीत दळणवळणाचं साधन म्हणून रेल्वेवरील प्रवाशांचा भार वाढला. आजमितीला ठाण्यापल्याडहून मुंबईकडे दर दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या २५ लाखांच्या आसपास आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर, ट्रान्स हार्बर आणि मुख्य मार्गावरील सेवा पकडून दर दिवशी १६८० उपनगरीय फेऱ्या होतात. यात ठाण्यापल्याडच्या प्रवाशांच्या वाटय़ाला मोजक्याच फेऱ्या येतात. ही संख्या ५०० हून अधिक नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दर दिवशी अक्षरश: जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागतो.
रेल्वेकडे जादा सेवांची मागणी करणारे आमदार राज्य सरकारकडे मात्र दळणवळणाच्या सेवाविस्ताराबाबत कोणतीही मागणी करताना दिसत नाहीत. वास्तविक रेल्वेवरील भार कमी करून कल्याण-डोंबिवली-ठाणे यादरम्यान रेल्वे रुळाला समांतर असा एक तरी रस्ता असावा, ही या परिसरातील लाखो नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे ठाणे-डोंबिवली-कल्याण हा प्रवास सुलभ होईल. तसेच या छोटय़ा अंतरात प्रवास करणारे हजारो प्रवासी या रस्तेमार्गाचा वापर करतील. मात्र राज्य सरकारने अद्याप तरी अशा कोणत्याही मार्गाची साधी घोषणाही केलेली नाही.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या रेल्वेची आणि त्याबरोबरच प्रवाशांची दमछाक होतच राहणार. ही सेवा सुधारण्यासाठी लागणारा पैसा नाही, असे कारण रेल्वेतर्फे नेहमीच दिलं जातं. त्यात तथ्य असेलही. पण तोपर्यंत ठाण्यापल्याडच्या लोकांनी असाच जीवघेणा प्रवास करायचा का, याचं उत्तर कोण देणार, हाच तूर्तास महत्त्वाचा प्रश्न आहे.
रोहन टिल्लू
संग्रहित लेख, दिनांक 10th Feb 2015 रोजी प्रकाशित
वाहतुकीचा रेड सिग्नल : दमलेल्या रेल्वेची कहाणी..
ठाणे आणि ठाण्यापल्याडच्या अनेक शहरांना व गावांना मुंबईशी जोडणारी व्यवस्था म्हणजे मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा!
First published on: 10-02-2015 at 12:26 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unusual story of local train