कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील १२ ते १८ वर्षांवरील वयोगटातील ९५ टक्के लाभार्थीचे करोना प्रतिबंधित लसीचे लसीकरण करण्यात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाला यश आले आहे. ज्येष्ठ आणि दुसरी मात्रा घेऊन नऊ महिने उलटलेल्या चार टक्के रहिवाशांनी वर्धक मात्रा घेतली आहे. लवकरच लसीकरणाचे टप्पे पूर्ण होतील, असा विश्वास लसीकरण विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश डोईफोडे यांनी व्यक्त केला.
पालिका हद्दीतील १५ लाख ४९ हजार १४१ रहिवाशांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य प्रशासनाचे आहे. १२ ते १८ वर्षांवरील वयोगटातील ११ लाख २४ हजार ८०० रहिवाशांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे. हे लसीकरण ७३ टक्के आहे. याच वयोगटातील १० लाख ६७ हजार ५०० रहिवाशांनी लशीची दुसरी मात्रा घेतली आहे. लसीकरणाचे हे प्रमाण ९५ टक्के आहे.
६० वर्ष व त्यावरील, सहव्याधी असलेल्या, लसीच्या दोन्ही मात्रा घेऊन नऊ महिने उलटून गेलेल्या ३७ हजार ३०० रहिवाशांनी वर्धक मात्रा घेतली आहे, अशी माहिती डॉ. डोईफोडे यांनी दिली. वर्धक मात्रा घेणाऱ्या रहिवाशांचे प्रमाण चार टक्के आहे.
१२ ते १४ वयोगटातील एकूण ५९ हजार ३२६ मुलांना करोना प्रतिबंधित लस देण्यात येणार आहे. या वयोगटातील १९ हजार ८०० मुलांनी पहिली मात्रा, एक हजार ८०० मुलांनी दुसरी मात्रा घेतली आहे. लसीकरणाचे हे प्रमाण नऊ टक्के आहे. १५ ते १७ वयोगटातील ९२ हजार ६०३ मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या वयोगटातील ५५ हजार २०० मुलांनी पहिली मात्रा, ३९ हजार ८०० मुलांनी दुसरी मात्रा घेतली आहे. लसीकरणाचे हे प्रमाण ७२ टक्के आहे.
१८ वर्षे वयोगटातील १३ लाख ९७ हजार २१२ रहिवाशांना करोना प्रतिबंधित लस देण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. या वयोगटातील १० लाख ५० हजार म्हणजे ७५ टक्के लाभार्थीनी पहिली मात्रा घेतली आहे. १० लाख २५ हजार ९०० लोकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. हे प्रमाण ९८ टक्के आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. डोईफोडे यांनी दिली. पालिकेची रुग्णालये, आरोग्य केंद्र, इतर आस्थापनांच्या ठिकाणी सुरू केलेल्या सुमारे २५ केंद्रांच्या माध्यमातून लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधारकार्ड घेऊन जाणाऱ्या रहिवाशांना त्याच्या लशीच्या मागणीप्रमाणे लसीकरण करून दिले जाते, असे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.