भाजपला धक्का, अवघ्या एका जागेने पिछाडीवर
जिल्ह्य़ातील सर्वात मोठय़ा आणि प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या वांगणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अखेर शिवसेना प्रणित आघाडीने बाजी मारली असून बदलापूर पालिकेपाठोपाठ वांगणीतही भाजपला धक्का बसला आहे.
वांगणी ही ठाणे जिल्ह्य़ातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. पालिका प्रशासनाने वेध लागलेल्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी उडी घेतली होती. १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत वांगणी विकास आघाडीला सर्वाधिकम्हणजे नऊ जागा मिळाल्या तर भाजपप्रणित ग्राम समृद्धी पॅनलला खालोखाल आठ जागा मिळाल्या. विशेष बाब म्हणजे याआधी भाजपप्रणित आघाडीची सत्ता ग्रामपंचायतीवर होती. मात्र यंदा मतदारांनी त्यात बदल केला. आमदार असूनही भाजपला पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांच्या वर्चस्वाला हा धक्का समजला जातो. राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणित स्वाभिमानी आघाडीला या निवडणूकीत भोपळाही फोडता आला नाही. मात्र राष्ट्रवादीने मिळवलेल्या मतांचा फटका भाजपप्रणित पॅनलच्या मतदारांना बसल्याचे दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी स्थानिक आमदारांसोबत वांगणीतील कार्यकर्तेही भाजपात गेले होते. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत तरी त्यांचा प्रभाव दिसला नाही. तीन प्रभागांमध्ये शिवसेनेचे स्पष्ट वर्चस्व दिसले.
बदलापूरनंतर नागरीकरणात वांगणीचा क्रमांक लागतो. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोर लावला होता. मुळात खरी लढाई शिवसेना आणि भाजपमध्ये झाली. शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री स्वत: यात लक्ष ठेवून होते, तर भाजपचे स्थानिक आमदार किसन कथोरेही घरोघरी जाऊन मते मागत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जिंतेद्र आव्हाडांनीही प्रचारात उडी घेतली होती. मात्र तरीही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्वाभिमानी पॅनलला एकही जागा मिळवता आली नाही. एकंदरीतच नगरपंचायचीच्या उंबरठय़ावर असलेल्या या सर्वात मोठय़ा ग्रामपंचायतीत शिवसेनेला सत्ता मिळवण्यात यश आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहा शेलार विजयी
या निवडणुकीत तब्बल सहा शेलार आडनावाचे उमेदवार विजयी झाले असून, त्यापैकी चार शेलार हे शिवसेनापुरस्कृत आघाडीचे आहेत तर दोन शेलार हे भाजपप्रणित आघाडीचे उमेदवार आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vangani village gram panchayat poll win by the shiv sena
First published on: 19-04-2016 at 03:59 IST