लोकार्पणाला ६ महिने उलटूनही पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक नाही; नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर

पोलीस यंत्रणा सक्षमरीत्या काम करत असून नागरिकांना त्याचा फायदा व्हावा, म्हणून अनेक ठिकाणी पोलीस चौकीची निर्मिती करण्यात येते. परंतु वर्तकनगर पोलीस ठाणे अंतर्गत उभारलेल्या लोकमान्य पाडा नं ४ येथील पोलीस चौकी लोकार्पण होऊन सहा महिने उलटले तरी अद्याप तिथे पोलिसांचा पत्ता नाही. त्यामुळे येथील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम आहे. काही सामाजिक संस्थांनी ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे लोकमान्य नगर पाडा नं.४ येथील चौकीत पोलीस नेमण्याची मागणी केली आहे.

वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारा लोकमान्य नगर परिसर हा दाट लोकवस्तीचा असल्यामुळे संवेदनशील विभाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी बऱ्याचदा तंटे, भांडण-मारामारी सारखे प्रकार घडतात. त्यामुळे गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ठाणे परिमंडळ-५ चे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या हस्ते पोलीस चौकीच्या नव्या वास्तूचे उद्घाटन केले होते. काही दिवस चौकीत पोलीस बंदोबस्त होता. मात्र त्यानंतर  चौकीतील पोलीस बंदोबस्त गायब झाला. त्यामुळे लोकमान्य नगरमधील गुंड प्रवृत्तींचे फावले असून कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, लोकमान्य नगर पोलीस चौकीच्या उद्घाटनप्रसंगी सुनील लोखंडे यांनी, या ठिकाणी असलेली पोलीस चौकीची गरज पूर्ण झाली असून, येथे किमान दहा पोलीस कर्मचारी असतील, असे आश्वासन दिले होते. मात्र, सध्या या ठिकाणी एकही पोलीस फिरकत नसल्याने चौकी पूर्णपणे बंद अवस्थेत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याच पाश्र्वभूमीवर  येथील ‘धर्मराज्य पक्षा’चे समीर गोलतकर यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, तात्त्काळ पोलीस चौकीत कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, असे आवाहन केले आहे.