शहरातील पोलीस ठाण्यांकडे प्रत्येकी एकच चारचाकी वाहन; माणिकपूर वगळता अन्य पोलीस ठाण्यांकडे दुचाकीही नाहीत

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि घटनास्थळी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी पोलिसांकडे सरकारी मालकीचे वाहन असणे आवश्यक आहे. वसई-विरारमधील पोलीस ठाण्यांकडे मात्र सरकारी वाहनांची कमतरता आहे. शहरात एकूण सात पोलीस ठाणी असली तरी प्रत्येक पोलीस ठाण्याकडे केवळ एकच चारचाकी वाहन आहे. सरकारी मालकीचे दुचाकी वाहन तर माणिकपूर पोलीस ठाणे सोडून एकाही पोलीस ठाण्याकडे नाही. वसईतील पोलीस खासगी वाहनानेच गस्ती आणि तपासाचे काम करतात. महापालिकेने या पोलिसांना वाहने देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र या आश्वासनांचा केवळ ‘धूर’च निघाला आहे.

वसई-विरार शहरात एकूण सात पोलीस ठाणी आहेत. लोकसंख्या वीस लाखांच्या घरात गेली आहे. गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुळात मनुष्यबळ कमी असल्याने पोलिसांना गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे. अशातच पोलिसांकडे पुरेसी वाहने नसल्याने त्यांना कामात अडचणी येत आहेत. वसईतले माहिती अधिकार कार्यकर्ते राज दसोनी यांनी याबाबात माहिती अधिकारात माहिती मागविली असता पोलिसांकडे पुरेसे वाहने नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दसोनी यांना मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक पोलीस ठाण्यांना केवळ एकच चारचाकी सरकारी वाहन आहे. माणिकपूर पोलिसांकडे फक्त नऊ मोटारसायकली आहेत. माणिकपूर वगळता अन्य कुठल्याही पोलीस ठाण्यांकडे सरकारी मालकीच्या मोटारसायकली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी स्वत:च्या खासगी मोटारसायकली वापराव्या लागत आहेत. चारचाकी जीप फक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक वापरतात. त्यामुळे इतर अधिकाऱ्यांना ते वापरता येत नाही. अचानक मोठा गुन्हा घडला किंवा लगेच तपासाला जायचे असेल तर वाहने आवश्यक असतात, पण ही सरकारी वाहने नसल्याने पोलिसांना खासगी गाडय़ा वापराव्या लागतात.

केवळ आश्वासन

पोलिसांकडे असलेल्या तुटपुंज्या वाहनांसाठी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांनी पालिकेकडे वाहने मागितली होती. महापौर प्रवीणा ठाकूर आणि आयुक्त सतीश लोखंडे यांनी पोलिसांच्या विनंतीला मान देत वाहने देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ते पूर्ण झालेले नाही. पोलिसांना पुरेशा साधनसामग्री आणि वाहने देण्याचे काम गृहविभागाचे आहे. परंतु प्रत्येक पोलीस ठाण्यात केवळ एकच जीप देऊन बोळवण केली आहे. त्यामुळेच पोलिसांना पालिकेकडे हात पसरावे लागले आहे. पालिका जी वाहने देणार आहे, ती पालिकेच्या मालकीची असणार आहेत. त्याची दुरुस्ती आणि देखभाल केवळ पोलीस करणार आहेत. वाहतूक पोलिसांकडेही तीच अवस्था आहे. पालिकेने वाहतूक पोलिसांना दिलेली टोइंग व्हॅनही काढून घेतल्याने वाहतूक पोलीस हतबल झाले आहेत.ू

खासगी वाहनांवर स्टिकर

खासगी वाहनांवर पोलीस स्टिकर लावता येत नाही. परंतु नाइलाजाने आम्हाला खासगी वाहनांवर स्टिकर लावून सरकारी काम करावे लागते, असे पोलिसांनी सांगितले. सरकारी वाहने नसल्याने कामात खूप अडथळे आणि मर्यादा येत असल्याचे अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. जर पोलिसांची जीप गस्तीच्या वेळी शहरात फिरत असेल तर गुन्हेगारांना वचक बसतो. पण आमच्याकडे एकच जीप असल्याने तिचा वापर किती करणार, असा सवाल एका पोलीस निरीक्षकाने केला आहे.

पोलीस महानिरीक्षकांच्या विनंतीवरून आम्ही पोलिसांना वाहने देत आहोत. नऊ वाहनांचे पैसे कंपन्यांना धनादेशाद्वारे दिले आहेत. पुढील आठवडय़ात ही वाहने पोलिसांना मिळतील. याशिवाय ब्रेथ अ‍ॅनालायझरही आम्ही देत आहोत.

– सतीश लोखंडे, महापालिका आयुक्त