आकर्षक वाहन क्रमांकाचा सोस आटला

नवीन वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा आपल्या पसंतीचा क्रमांक घेण्याकडे ओढा असतो.

शुल्क कमी करण्यासाठी ठाणे आरटीओचा प्रस्ताव

आपल्या वाहनाचा क्रमांक आकर्षक वा वैशिष्टय़पूर्ण वाटावा यासाठी विशिष्ट क्रमांकाच्या नोंदणीसाठी भरमसाट पैसे भरण्याची हौस ठाण्यात कमी होताना दिसत आहे. असे वैशिष्टय़पूर्ण वा पसंतीचे क्रमांक मिळवण्याकडे वाहनखरेदीदारांचा असलेला ओढा गेल्या वर्षभरात कमी झाला आहे. या क्रमांकांसाठी आकारण्यात येणारे शुल्क जास्त असल्याचे प्रमुख कारण यामागे सांगितले जात आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने पसंतीच्या क्रमांकांसाठीचे शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव परिवहन खात्याकडे पाठवला आहे.

नवीन वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा आपल्या पसंतीचा क्रमांक घेण्याकडे ओढा असतो. आधीच्या वाहनाला असलेला क्रमांक, शुभ अंक, जन्मतारीख यांपासून आकडय़ांच्या दृश्यरचनेतून विशिष्ट नावे साकारण्याच्या हेतूने या क्रमांकांना पसंती दिली जाते. याखेरीज आपण विशेष व्यक्ती असल्याचे मिरवण्यासाठीही ठरावीक क्रमांकांचा आग्रह धरला जातो. पूर्वी प्रादेशिक परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे वशिला लावला जात असे. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर शासनाने अशा क्रमांकांसाठी जादा शुल्क आकारणी सुरू केली. तरीही विशिष्ट क्रमांकांसाठी जास्त पैसे मोजण्याची तयारी अनेक जण दाखवतात. परंतु, गेल्या वर्षभरात ठाणे आरटीओच्या हद्दीत हे प्रमाण कमी होऊ लागल्याचे दिसून आले आहे.

२०१६-१७ यावर्षी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातून वेगवेगळ्या अनुक्रमांकांसाठी १० हजार १२६ जणांनी जादा शुल्क मोजले. यातून परिवहन विभागाला ९ कोटी १६ लाख ५५ हजार रुपयांचा महसूल मिळाला. मात्र, त्याआधीच्या पाच वर्षांच्या तुलनेत हा महसूल कमी असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाने म्हटले आहे. विशेष म्हणजे साडेचार लाख रुपयांपेक्षा जास्त शुल्क असलेला एकमेव क्रमांक त्या वर्षी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात नोंदवला गेला आहे, अशी माहिती आरटीओतील अधिकाऱ्यांनी दिली.

ग्राहकांचा ठरावीक क्रमांकांकडील ओढा कमी झाल्याचे लक्षात आल्याने आता आरटीओने या क्रमांकांसाठीचे शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.

गेल्या काही वर्षांत वाहन खरेदीचे प्रमाण वाढले आहे. वाहन खरेदीसाठी उत्सुक असलेले खरेदीदार आकर्षक क्रमांक मिळविण्यासाठी पैसे मोजण्याच्या तयारीत नसतात असा अनुभव आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नव्या वाहनधारकांनी आकर्षक क्रमांक घ्यावेत यासाठीचे शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

– नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Vehicle choice number crez rto

ताज्या बातम्या