कल्याणमधील जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
केंद्रात आणि राज्यात ‘अरेला कारे’ उत्तर देणाऱ्या प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. विरोधी पक्ष असून नसल्यासारखा झाल्याने सध्या एकहाती, मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे. फक्त विकासकामांच्या घोषणा होतात, त्यांच्या अंमलबजावणीच्या नावाने शून्य. हे सगळे थांबवायचे असेल तर केंद्रात पाहिजेच, त्याचबरोबर राज्यातही प्रबळ विरोध पक्षाची गरज आहे. ही उणीव आपला पक्ष भरून काढेल. यासाठी मनसेच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी कल्याणमधील फडके मैदानावर जाहीर सभेत केले.
पाच वर्षांपूर्वी कल्याण, डोंबिवलीच्या विकासासाठी सत्ताधारी भाजप सरकारने केलेल्या घोषणा, ६ हजार ५०० कोटींचे पॅकेज आणि त्याची शून्य अंमलबजावणी या विषयावरून राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. आपणास कोणी जाब विचारू शकत नाही अशी एक गुर्मी या सरकारमध्ये निर्माण झाली आहे. आता प्रबळ विरोधी पक्ष नसल्यामुळे ही दुर्बल परिस्थिती निर्माण झाली आहे. हे रोखण्यासाठी सक्षम, तडजोडी न करणारा विरोधी पक्ष आता अस्तित्वात आला पाहिजे. हे काम मनसेचे शिलेदार नक्कीच करतील, असा विश्वास व्यक्त यावेळी व्यक्त केला. सरकारी नोकरदारांची ३० टक्के कपात करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. हे प्रमाण ५० टक्केवर पण जाईल. मग पुढील पिढीला नोकऱ्या राहणार की नाहीत, असा प्रश्न करून आपल्या मनातील आग मतपेटीतून व्यक्त करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.