निलंबनाची कारवाई न केल्याने शिवसेनेत अस्वस्थता

भाजप उमेदवारांच्या विरोधात बंड करणाऱ्या बंडखोरांवर कारवाई करणाऱ्या भाजपच्या प्रदेश संघटनेने कल्याण पश्चिमेतील पक्षाचे बंडखोर उमेदवार नरेंद्र पवार यांच्यावर मात्र कारवाई टाळल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्याविरोधात शिवसेनेने बंडाचे निशाण फडकविल्याने पश्चिमेत पवार यांनी उमेदवारी कायम ठेवत शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. या बंडाची चर्चा संपूर्ण जिल्ह्य़ात सुरू असतानाही पक्षाने कारवाईच्या पहिल्या टप्प्यातून पवार यांना अभय दिल्याने शिवसेना नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विद्यार्थी परिषदेपासून भाजपचे निष्ठेने काम करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते, संघ स्वयंसेवक नरेंद्र पवार यांच्यावर तडकाफडकी कारवाई करणे योग्य होणार नाही. तसेच कल्याणमधील भाजपचा एक चेहरा म्हणून त्यांची असलेली ओळख विचारात घेऊन कारवाईतून पवार यांना मात्र वगळण्यात आले आहे, असे भाजपमधील एका विश्वसनीय सूत्राने सांगितले. पवार यांना डोंबिवलीतील भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांचाही पाठिंबा असल्याची चर्चा आहे.

विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता, भाजपचा आमदार, संघाचा स्वयंसेवक, तळागाळात तळमळीने काम करणारा पदाधिकारी अशी पवार यांची कल्याण पश्चिमेत ओळख आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील जुन्या कार्यकर्त्यांच्या फळीत त्यांची नेहमीच ऊठबस राहिली आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या विजयात याच मंडळींनी महत्त्वाची भूमिका बजावली  होती. दसऱ्यानिमित्त संघाच्या संचलनातही पवार हिरिरीने सहभागी झाले होते. शिवसेनेविरोधात बंड करताना त्यांनी संघातील वरिष्ठ वर्तुळाशी सल्लामसलत केल्याची चर्चा आहे.

आमदार म्हणून पवार यांनी कल्याण पश्चिमेत काम केली आहेत. याशिवाय मराठा, कैकाडी, अनुसूचित जाती प्रवर्ग, गुजराती, मारवाडी, ब्राह्मण, खानदेशी अशा जाती समूहांशी पवार यांचा विकास, मदतीच्या माध्यमातून संबंध आहे. असा जनतेची मोठी फळी पाठी असलेला कार्यकर्ता एकदम वाऱ्यावर सोडून दिला तर त्याची किंमत अप्रत्यक्षपणे भाजपलाही मोजावी लागेल, हा विचार भाजपने केल्याचे कळते.   मेट्रो प्रकल्प उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या वेळी या भागातील नियोजन करण्यात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बरोबर नरेंद्र पवार यांचा मोलाचा वाटा होता.

डोंबिवलीत रवींद्र आणि कल्याणात नरेंद्र अशी भाजपमधील जोडी आहे. ही जोडी फुटता कामा नये असाही एक विचार भाजपच्या गोटात असल्याची चर्चा आहे. हा विचार करून पक्षाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला नसल्याचे कळते.

भाजपचा राजीनामा

पक्षाचे निष्ठेने काम करूनही पक्षाने आपणावर अन्याय केला. आपल्या कामाची दखल पक्षाने घेतली नाही. त्यामुळे आपण भाजपच्या प्रदेश सचिव, भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, असे नरेंद्र पवार यांनी जाहीर केले आहे. पक्षाकडून निलंबनाची कारवाई होण्यापूर्वीच पवार यांनी अगोदरच हा निर्णय घेतला आहे. आपल्या निर्णयामुळे पक्षाला कोणताही त्रास होऊ नये म्हणून आपण हा निर्णय घेत आहोत, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

जनता आपल्या पाठीशी आहे. याचे भान पक्षाला आहे. आपली जनमताची ताकद ओळखून भाजपमधील काही ज्येष्ठ मंडळी आपणास समजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकेक जण आपल्या बाजूला वळत आहे. लवकरच सर्वानाच आपली किंमत कळेल. –नरेंद्र पवार, भाजप बंडखोर उमेदवार