या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दफनविधीसाठी जमीन उपलब्ध करून देत नसल्याने नाराजी

कल्याण पश्चिमेतील मोहने विभागात मोठय़ा संख्येने वास्तव्यास असलेल्या मुस्लीम, ख्रिश्चन समाजाला मोहने, आंबिवली परिसरात दफनविधी करण्यासाठी मागील अनेक वर्षे जमिनीची मागणी करूनही लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडून त्याची दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे या दोन्ही समाजाने विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

दफनविधीसाठी या भागातील रहिवाशांना तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या बैलबाजार किंवा विठ्ठलवाडी येथील दफनभूमीत जावे लागते. वडवली, आंबिवली, मोहने, बल्याणी परिसरात मुस्लीम, ख्रिश्चन समाजाची वस्ती आहे. कष्टकरी, व्यावसायिक समाजातील हा वर्ग आहे. आम्ही राहत असलेल्या परिसरात पालिका प्रशासनाने, शासनाने आम्हाला दफनविधीसाठी सरकारी जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मागील १५ वर्षांपासून या समाजाकडून केली जात आहे. निवडणुका आल्या की दफनविधीसाठी जागा देऊ, असे आश्वासन दिले जाते. प्रत्यक्ष कृती केली जात नाही. यावेळी उमेदवारांच्या भूलथापांना बळी पडायचे नाही आणि मतदारावर बहिष्कार टाकायचा, असा निर्णय मोहने परिसरातील मुस्लीम, ख्रिश्चन समाजाच्या रहिवाशांनी घेतला आहे.

आंबिवली येथे इराणी वस्ती आहे. या समाजासाठी माजी मंत्री दिवंगत साबीर शेख यांनी बल्याणी रोड भागात दफनभूमी उपलब्ध करून दिली होती. ही जागा आता अपुरी पडू लागली आहे. आमदार, खासदारांकडे वारंवार हा प्रश्न उपस्थित करूनही ते फक्त आश्वासने देण्यापलीकडे कृती करीत नाहीत, असे रहिवाशांचे म्हणणे

आहे.  मोहने ते बैलबाजार, विठ्ठलवाडी येथे शव खांद्यावरून नेणे शक्य नसल्याने टेम्पोचा वापर करावा लागतो. त्यामुळे आधी दफनभूमीचा प्रश्न सोडवा, मग मतदान करतो, अशी आक्रमक भूमिका मोहने परिसरातील मुस्लीम, ख्रिश्चन समाजाने घेतली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidhan sabha election christian muslim votes akp
First published on: 19-10-2019 at 01:39 IST