पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
कल्याण पूर्वेत शिवसेनेच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन बंडखोर उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे. या सर्व बंडखोर, राजीनामा देणाऱ्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य कारवाई करतील. राजीनामा देण्याचा परिणाम पक्षप्रमुख, पक्षाच्या उमेदवारावर नव्हे तर देणाऱ्यांवर होईल, असा इशारा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी कल्याण स्पोर्ट्स क्लबमध्ये युतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या मेळाव्यात दिला.
या मेळाव्याला माजी मंत्री जगन्नाथ पाटील, खा. कपिल पाटील, सचिन बासरे, राजेंद्र देवळेकर उपस्थित होते. कल्याण पश्चिमेतून महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर, कल्याण पूर्वेतून युतीचे उमेदवार गणपत गायकवाड यांनाच विजयी करायचे आहे. कल्याण पूर्वेत शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी राजीनामे पक्षप्रमुखांकडे पाठविले आहेत. यामध्ये काही सेना पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे राजीनामे वरिष्ठांना मिळोत न मिळोत ज्यांनी बंडखोर उमेदवाराचा प्रचार पक्षाच्या पदाचा राजीनामा देऊन केला आहे त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. ही कारवाई पक्षप्रमुख योग्य वेळी करतील.
येत्या काळात कल्याण डोंबिवली पालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्यावेळी या बंडखोर उमेदवारांना पश्चात्ताप करण्याची पाळी येईल, असे सूचक वक्तव्य करीत या मंडळींचे पत्ते येत्या पालिका निवडणुकीत कापले जातील, असे संकेत दिले. जगन्नाथ पाटील यांनी महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून येणे किती महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने एकजुटीने काम करणे कसे महत्त्वाचे आहे हे सांगितले.