ठाणे : मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर या मुंबई महानगरातील प्रमुख शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडी होत आहे. गेल्या दोन दिवसात या वाहतूक कोंडीत वाढ झाल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत असल्याचे दिसून येत आहे. पालघरमधील वाहतूक कोंडीमुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ओवळा माजीवडा मतदार संघाचे प्रतिनिधित्व राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik ) करतात. या मतदार संघाचा भाग असलेल्या मीरा भाईंदर शहराला जोडणाऱ्या दहिसर टोल नाक्याजवळील वाहतूक कोंडीत मंत्री सरनाईक यांचे वाहन अडकून पडले होते. त्याचाच व्हिडीओ शेअर करत काँग्रेस नेते विक्रांत चव्हाण ( Vikrant chavan ) यांनी मंत्री सरनाईक यांची खिल्ली उडवली आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर या मुंबई महानगरातील प्रमुख शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडी होत आहे. यातील ठाणे, नवी मुंबई आणि पालघर या शहरांमधून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. ही सर्व वाहन शिळफाटा, मुंब्रा बाह्य वळण मार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग आणि घोडबंदर मार्गावरून वाहतूक करतात. याशिवाय मार्गावरून स्थानिक नागरिकांची वाहने वाहतूक करतात. घोडबंदर मार्गावर मेट्रो प्रकल्प तसेच सेवा आणि मुख्य रस्ते जोडणीचे काम सुरू आहे. या कामामुळे घोडबंदरचा रस्ता अरुंद झाल्याने येथे वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच या मार्गावरील गायमुख घाटातील रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या कोंडीमुळे नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले असून या कोंडीमुळे नागरिक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहे.
सरनाईकांनी प्रचारासाठी तयार केले होते निवडणूक गीत
ओवळा माजीवडा मतदार संघाचे प्रतिनिधित्व राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक करतात. या मतदार संघात ठाणे महापालिका क्षेत्रातील वतर्कनगर, घोडबंदर आणि त्याचबरोबर मिरा भाईंदर महापालिका क्षेत्राचा भाग येतो. या मतदार संघातुन सरनाईक हे चार वेळा निवडून आले आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी प्रचारासाठी एक निवडणूक गीत तयार केले होते. ‘ इथे एकच नाव प्रताप सरनाईक ‘ असे निवडणूक गीताचे बोल होते. हे गीत आणि त्यासोबत गेल्या १५ वर्षात आमदारकीच्या कार्यकाळात केलेली विकासकामे असे रील तयार करण्यात आले होते. गीत खूपच गाजले होते. मात्र, काँग्रेस नेते विक्रांत चव्हाण यांनी मंत्री सरनाईक यांच्या निवडणूक गीताची खिल्ली उडवली आहे.
गीताची उडवली खिल्ली
काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण हे मंत्री सरनाईक यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांनी सरनाईक यांच्या विरोधात दोनदा विधानसभेची निवडणूक लढवली आहे. या दोन्ही निवडणुकीत सरनाईक यांनी त्यांचा पराभव केला. चव्हाण हे सरनाईक यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांनी मंत्री प्रताप सरनाईक वाहतूक कोंडीत अडकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी ‘ दहिसर टोलनाक्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकले परिवहन मंत्री ‘, असे कॅप्शन दिले आहे. त्यासोबतच ‘ इथे एकच नाव प्रताप सरनाईक ‘ हे निवडणूक गीत व्हिडीओसोबत जोडून सरनाईक यांची खिल्ली उडवली आहे.