पशुधन, शेती वाहून गेल्याने खडवलीतील ग्रामस्थ चिंताग्रस्त

किशोर कोकणे, ऋषीकेश मुळे

ठाणे : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात अडकलेल्या खडवली येथील जूगाव भागातील नागरिकांची राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, नौदल, वायुदल अशा विविध यंत्रणांच्या मदतीने सुटका करण्यात आली. मात्र, पुराच्या तडाख्यात या गावांतील नागरिकांचे होते नव्हते सारे वाहून गेले आहे. अनेकांची गुरे पुरात वाहून गेली, तर कित्येकांची शेती पूर्णपणे नष्ट झाली आहे. त्यामुळे पुरातून जीव सहीसलामत राहिल्याबद्दल देवाचे आभार मानायचे की उदरनिर्वाहाचे साधन बुडाल्याने शोक करायचा, असा प्रश्न या ग्रामस्थांना पडला आहे.

खडवली येथील जूगाव शेकडो वर्षांपूर्वी चार नद्यांच्या मध्यभागी वसले आहे. सुमारे ८० ते ९० नागरिक या गावात राहत असून आदिवासींची संख्या जास्त असल्याने अनेक नागरिकांचा व्यवसाय म्हशी किंवा शेळ्या-मेंढय़ा पाळून चालतो, तर गावातील अनेक जण शेतकरी आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात मुसळधार पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केली आणि शनिवारी सकाळपासून गावातील दोन ते तीन घरे पाण्याखाली गेली. गावातील परिस्थिती बिकट झाल्याने येथील काही नागरिक घरे सोडून त्यांच्या नातेवाईकांकडे गेली होती, तर ५८ जण अद्यापही गावात होते. रविवारी पुराचा प्रभाव वाढत गेला आणि गावाला जोडणारा पूलही पाण्याखाली गेला. गावातील घरे पाण्याखाली गेली. अशा वेळी सर्व ग्रामस्थ एका उंच ठिकाणी गोळा झाले व मदतीसाठी त्यांनी आसपासच्या गावांतील ग्रामस्थांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. त्यानंतर माध्यमांतही माहिती पोहोचल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, नौदल आणि महापालिकांचे आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथके जूगाव परिसरात दाखल झाली. मात्र, नदीतील पुराचे पाणी वाहते असल्याने त्यासमोर नौदलाच्या बोटीदेखील निष्फळ ठरत होत्या. अखेर वायुदलाला पाचारण करायचे ठरले. वायुदलाचे अधिकारी घटनास्थळी आले. हेलिकॉप्टरने घिरटय़ा घातल्या. मात्र, गावकरी कोणत्या ठिकाणी उभे आहेत. याची माहिती त्यांना मिळत नव्हती. त्यानंतर येथील गावकऱ्यांना मोबाइलद्वारे पुन्हा संपर्क साधून धूर करा किंवा एखादी खूण दाखविण्याची सूचना दिली. यानंतर गावकऱ्यांनी रस्त्यावर पडलेले एक टायर घेतले आणि त्याला आग लावली. या आगीमुळे धूर निर्माण झाला. त्यानंतर वायुदलाला गावकरी कुठे उभे आहेत याची माहिती मिळाली. त्यानंतर गावकऱ्यांना वायुदलाच्या हेलिकॉप्टरमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

हे बचावकार्य सुरू असतानाच पुरात वाहून चाललेल्या शेळय़ा, मेंढय़ा, गाई, म्हशी पाहून ग्रामस्थांना अश्रू अनावर होत होते. जनावरांना सोडून जाण्यास अनेक जण तयार नव्हते. गावकऱ्यांना ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेत रविवारी आणण्यात आले असून त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

‘माझ्यासोबत दीड महिन्यांचे बाळ होते.  या पुरातून बाहेर कसे पडावे, हा प्रश्न होता. आता गावात जाऊन घर कसे चालवावे,’ हा प्रश्न निर्माण झाला आहे, असे आरती जाधव या महिलेने सांगितले. ‘पिढय़ान्पिढय़ा आम्ही गावात शेती करतो. तसेच म्हशीही होत्या. मात्र, आता तेदेखील वाहून गेले आहे,’ असे रहिवासी सुवर्णा पालवी यांनी सांगितले.