गृहमंत्री होऊन भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा करण्यापेक्षा भ्रष्टाचार न करणारी पिढी तयार करण्यासाठी राज्याचा शिक्षणमंत्री झालो, असे शालेय शिक्षण, उच्च तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी ठाण्यात सांगितले.
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी संघटनेच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात तावडे बोलत होते. यावेळी पर्यावरण खात्याचे राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अन्बलगन, पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव अजय मेहता, कर्मचारी संघटनेचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आला. प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या एकत्र कराव्यात, त्यानंतर मागण्यांवर चर्चा करणे उचित होईल, असे तावडे यावेळी म्हणाले. शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी बालभारती मंडळासारखे ‘ई-बालभारती मंडळ’ सुरू करणे गरजेचे आहे. तसेच सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत अमूलाग्र बदल करावा लागेल, असे मत त्यांनी मांडले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकविताना महाराजांच्या शौर्याच्या पलीकडे जाऊन ते कशा प्रकारे उत्तम प्रशासक होते हे विद्यार्थ्यांना शिकवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी नवनवीन अभ्यासक्रमाची रचना करून त्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जाऊ शकतात, असे तावडे यावेळी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinod tawde explaining about his portfolio selection
First published on: 29-04-2015 at 12:05 IST