दुरुस्तीचे काम पूर्ण; वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय

ठाणे आणि नवी मुंबई शहरातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विटावा रेल्वे पुलाखालील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण झाले असून यामुळे या मार्गावरील वाहतूक आज, मंगळवार सायंकाळपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे आनंदनगर-ऐरोली या मार्गावर वाढलेला वाहनांचा भार कमी होऊन वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. याशिवाय, कळव्याच्या दिशेने जाणाऱ्या कोर्टनाका, साकेत, कॅसलमिल, सिडको या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार असून यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोंडीचा सामना करणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

ठाणे आणि नवी मुंबई शहरातील वाहतुकीसाठी ठाणे-बेलापूर हा मार्ग महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरील विटावा रेल्वे पुलाखालील रस्त्यावर खड्डे पडले होते. या खड्डय़ांमुळे पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक संथ होऊन कोंडी होण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने या पुलाखालील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम गेल्या आठवडय़ात अचानक हाती घेतले. त्यासाठी या मार्गावरील वाहतूक बंद करून ऐरोली-आनंदनगर मार्गे वळवण्यात आली होती. दुरुस्ती काम सहा दिवस चालणार असल्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी ११ जूनपर्यंत वाहतूक बदल लागू केले होते. मात्र, दुरुस्तीचे काम नुकतेच पूर्ण झाले असून त्या ठिकाणी रस्ता मजबुतीकरणासाठी पाणी सोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महापालिकेने आज, मंगळवार सायंकाळपासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात पालिका प्रशासनाने वाहतूक पोलिसांनाही माहिती दिली आहे.

विटावा रेल्वे पुलाखाली ठाण्याहून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर सिमेंट काँक्रीटचे बॉक्स बसवण्यात आले आहेत. या पुलाखाली नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत. याशिवाय, डोंगरातून वाहून येणारे पाणी याठिकाणी साचते. त्यामुळे हा रस्ता वारंवार नादुरुस्त होतो. दरवर्षी या मार्गावरील वाहतूक बंद ठेवून या ठिकाणी दुरुस्तीचे काम करण्यात येते. यापूर्वी सिमेंट काँक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक, लोखंडी गजांचा वापर करून सिमेंट काँक्रीटीकरण अशा उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही हा रस्ता नादुरुस्त झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे यंदाची दुरुस्ती यशस्वी ठरते का किंवा पालिकेवर पुन्हा पुढच्या वर्षी दुरुस्तीची वेळ ओढवेल का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

दुरुस्ती अशी झाली..

ठाणे-बेलापूर मार्गावरील विटावा रेल्वे पुलाखालील रस्त्यावर यापूर्वी दुरुस्ती कामासाठी टाकण्यात आलेले पेव्हर ब्लॉक आणि सिमेंटचा तीन इंचापर्यंतचा थर काढण्यात आला आहे. त्या जागेवर पुन्हा अत्याधुनिक म्हणजेच एम-६० ग्रेड काँक्रीट पद्धतीने काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. या पद्धतीमुळे तीन दिवसात मजबूत रस्ता करणे शक्य होत असल्याने याठिकाणी या पद्घतीचा वापरण्यात आला आहे. या पद्धतीमुळे रस्त्याखाली नैसर्गिक झऱ्यामुळे साचणारे पाणी थांबण्यास मदत होणार असून त्याचबरोबर रस्ता लवकर नादुरुस्त होणार नाही, असा पालिकेचा दावा आहे.

विटावा रेल्वे पुलाखालच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून यामुळे मंगळवार सायंकाळपासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तसेच अत्याधुनिक पद्घतीने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आल्यामुळे रस्ता लवकर नादुरुस्त होणार नाही.    – रवींद्र खडताळे, महापालिका नगर अभियंता