वसई-विरार महापालिकेच्या बसवर पर्यावरण वाचविण्याचे संदेश, पण बसमधून मोठय़ा प्रमाणात धूरफवारणी; वाहतूक पोलिसांकडून नोटिसा

‘स्वच्छ वसई, सुंदर वसई’, ‘पर्यावरण वाचवा’.. अशा प्रकारची पर्यावरणविषयक घोषवाक्य वसई-विरार परिवहन सेवेच्या बसवर आढळतात. मात्र पर्यावरणाविषयी जागरूक राहण्याचे ‘ब्रह्मज्ञान’ देणारी ही परिवहन सेवा स्वत: पर्यावरणाविषयी ‘कोरडे पाषाण’ असल्याचे दिसून येत आहे. महापालिका परिवहन सेवेच्या बस बकाबक धूर ओकतात आणि पर्यावरण दूषित करीत असल्याचे चित्र आहे. बसमधून धूर येण्याचे प्रमाण अजून थांबले नसून ठेकेदाराने प्रादेशिक परिवहन खात्याला चुकीचा अहवाल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता वसई वाहतूक पोलिसांनी ठेकेदाराला नोटिसा बजावून गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. पालिकेच्या बसमधून मोठय़ा प्रमाणावर धूर निघत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

वसई-विरार महापालिकेतर्फे परिवहन सेवेच्या ताफ्यात सध्या १४९ बसेस आहेत. त्यापैकी २५ बस या पालिकेच्या मालकीच्या आहेत, तर ११९ बस या ठेकेदाराच्या आहेत. भगीरथ ट्रान्सपोर्ट कंपनी या ठेकेदाराला परिवहन सेवेच्या बस चालविण्याचे कंत्राट देण्यात आलेले आहे. ‘स्वच्छ वसई, सुंदर वसई’, ‘पर्यावरण वाचवा’ असा संदेश देणारे घोषवाक्य या बसवर लावण्यात आलेले आहे. परंतु या बसमधून मोठय़ा प्रमाणावर धूर येतो. हा धूर एवढा जास्त प्रमाणात असतो की त्या बसच्या मागे असलेल्या वाहनचालकाला गुदमरायला होते. त्याबाबत अनेक वेळा नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत होते. नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी पालिकेला खडसावले होते. त्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने या ठेकेदाराला नोटिसा बजावल्या होत्या. ठेकेदाराने सगळ्या बसची पीयूसी (पोल्युशन अंडर कंट्रोल) करून धूर निघत नसल्याचा अहवाल सादर केला आहे. परंतु अद्यापही या बसमधून धूर येत आहे. त्यामुळे वसई वाहतूक पोलिसांनी ठेकेदाराला नोटीस बजावून लवकर सुधारणा केली नाही, तर गुन्हे दाखल करून जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. ठेकेदार बसची काळजी घेत नाही, योग्य निगा राखत नाही. नकली वंगण वापरतो. त्यामुळे धूर निघत असल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी केला आहे. एकीकडे ‘पर्यावरण बचाव’चा नारा द्यायचा आणि दुसरीकडे पालिकेच्या बसच्या माध्यमातून प्रदूषण करायचे हा विरोधाभास असून पालिकेचे जनतेच्या आरोग्याकडे किती लक्ष आहे ते दिसून येत असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

असंख्य तक्रारी आल्यानंतर ठेकेदाराने तपासणी करून धूर येत नसल्याचा दावा करणारा अहवाल सादर केला आहे. परंतु अद्यापही धूर येत असल्याने ही प्रशासन आणि जनतेची फसवणूक असल्याचे स्पष्ट होत आहे.

ठेकेदाराला नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर त्याने सगळ्या बसच्या पीयूसी करून धूर निघत नसल्याचा अहवाल आमच्याकडे सादर केला आहे. कुणाला जर बसमधून धूर निघत असल्याचे आढळल्यास आमच्याकडे संपर्क करावा

– अभय देशपांडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वसई

काही बसमधून धूर येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे ठेकेदाराला आम्ही सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी अशा बस आढळल्या तर पालिकेकडे तक्रारी कराव्यात.

– किशोर गवस, उपायुक्त,

नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने आम्ही ठेकेदाराला नोटीस बजावलीे आहे. लवकर सुधारणा न झाल्यास गुन्हे दाखल करून बस जप्त केल्या जातील.

– रणजीत पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई