अंबरनाथ: वालधुनी नदीत रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याने या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी कोणत्याही यंत्रणेला अद्याप ठोस उपाय मिळाला नाही. त्यामुळे वर्षभरापूर्वी डोंबिवली, बदलापूर आणि अंबरनाथच्या औद्योगिक क्षेत्रात सायंकाळी सहा वाजल्यापासून सकाळी सहा वाजल्यापर्यंत टँकर बंदी घालण्यात आली. यावर उपाय म्हणून औद्योगिक वसाहतीत तपासणी चौक्या उभारण्यात आल्या. मात्र वर्षभरानंतरही या चौक्या सुरू होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांनी औद्योगिक क्षेत्रातील सायंकाळनंतरची टँकर बंदी आणखी दोन महिन्यांसाठी कायम ठेवली आहे. या निर्णयामुळे उद्योजकांत संतापाचे वातावरण आहे.

हेही वाचा <<< भातसा धरणाचे सर्व दरवाजे १.२५ मीटरने उघडले; धरणातून ६५० क्युसेक पाण्याच्या विसर्ग सुरु

हेही वाचा <<< कल्याण, डोंबिवलीतील रस्ते पाण्याखाली; टिटवाळा येथील काळू नदीवरील रुंदे पूल पाण्याखाली

गेल्या काही वर्षात ठाणे जिल्ह्यातील नद्या, नाले आणि इतर जलस्त्रोत प्रदुषीत झाले आहेत. यासाठी औद्योगिक वसाहतीतील काही घटकांना दोषी मानले जाते आहे. काही कंपन्यांवर कारवाईही केली जाते. मात्र त्यानंतरही प्रदुषणावर आळा घालण्यात यश आलेले नाही. या काळात उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या प्रदुषणावर सर्वाधिक चर्चा झाली. वालधुनी नदीपात्रात अनेकदा रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याचे समोर आले. काही टँकरवर कारवाई झाली. मात्र त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासकीय यंत्रणांना कोणताही उपाय सापडला नाही. सहसा रात्रीच्या वेळी हे टँकर वालधुनी नदी किंवा इतर जलस्त्रोतांत सोडले जात असल्याने रात्रीच्या वेळी टँकरचा प्रवास थांबवण्याचा जालीम उपाय शासकीय संस्थांकडून शोधण्यात आला. गेल्या वर्षात ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेच्या माध्यमातून सायंकाळी सहा ते सकाळी सहा या बारा तासांसाठी औद्योगिक क्षेत्रात प्रवेश बंद करण्यात आला. वर्षभरात हा निर्णय तीन वेळा कायम करण्यात आला. त्यामुळे परराज्यातून, वाहतूक कोंडींमुळे इच्छित कंपन्यांपर्यंत पोहण्य़ात उशिर होणाऱ्या कच्चा माल, द्रवरूप रसायन आणि तयार रसायनांच्या टँकरला औद्योगिक क्षेत्राच्या दारावरच खोळंबून रहावे लागते आहे. परिणामी कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होत असून त्याचा कंपन्यांनाही आर्थिक फटका बसतो आहे. टँकर मालकांनाही चालक, वाहकांना अधिकचे पैसे द्यावे लागतात. त्यामुळे उद्योजकांत संतापाचे वातावरण आहे. त्यावर उपाय म्हणून औद्योगिक क्षेत्रांच्या प्रवेशद्वारावर तपासणी चौक्या उभारण्यात आल्या. गेल्या वर्षात उभारण्यात आलेल्या या चौक्यांना सुरक्षा रक्षक नेमूण ते सुरू करण्याची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास विभागावर होती. मात्र वर्षभरानंतरही या चौक्या धुळखात पडून आहेत. एमआयडीसी प्रशासनाच्या या दिरंगाईचा फटका उद्योजकांना बसतो आहे. त्यात आता ही टँकर बंदीचा आदेश पुढील दोन महिन्यांसाठी कायम करण्यात आला आहे. विशेष पोलीस शाखेचे उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे यांनी याबाबतचा आदेश जाहीर केला आहे. त्यामुळे उद्योजकांत नाराजी पसरली आहे.

प्रतिक्रियाः गेल्या वर्षात तपासणी चौक्या उभारल्यानंतर वाहने रोखण्याची यंत्रणा नुकतीच बसवण्यात आली. सुरक्षा रक्षक नेमण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे. त्यावर लवकरच निर्णय़ होण्याची शक्यता आहे.

– दिलीप आव्हाड, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी, अंबरनाथ.