गर्दी वाढल्याने आरटीपीसीआर अहवाल मिळविण्यास विलंब

ठाणे : ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत ओमायक्रॉन तसेच करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने करोना आरटीपीसीआर चाचणीसाठी येणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेनुसार आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल २४ तासात तयार होणे आवश्यक असते. परंतु आरटीपीसीआर चाचणी करण्यास नागरिकांची गर्दी होऊ लागल्याने आता अहवाल मिळविण्यासाठी नागरिकांना ३६ ते ४८ तास लागत आहे.

ठाणे जिल्ह्यात दोन दिवसांत तीन हजारहून अधिक करोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. बहुतांश रुग्णांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे आहेत. करोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे गेल्याकाही दिवसांपासून आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी चाचणी केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) नियमानुसार २४ तासांत  आरटीपीसीआर अहवाल तयार करणे आवश्यक असते. जिल्ह्यात १५ ते २० दिवसांपूर्वी जिल्ह्यात १० ते ११ हजार आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात होत्या. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात दररोज १७ ते १८ हजार आरटीपीसीआर करोना चाचण्या होऊ लागल्या आहेत. एकाच वेळी इतक्या मोठ्याप्रमाणात अहवाल तयार करावे लागत अल्याने त्याचा ताण प्रयोगशाळांवर येऊ लागला आहे. त्यामुळे आता आरटीपीसीआर अहवालासाठी आता ३६ ते ४८ तास लागत असल्याचे काही खासगी प्रयोगशाळांतील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. अहवाल वेळेत मिळत नसल्याने करोना बाधितावर उपचारास विलंब होत आहे.

दुष्परिणाम होण्याची शक्यता

करोना चाचणी व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीस परदेशात जायचे असल्यास आरटीपीसीआर चाचणी करावी लागते. तसेच इतर आजार असलेल्या रुग्णांनाही त्यांच्यावरील उपचार करण्यापूर्वी संबंधित डॉक्टर त्यांचा आरटीपीसीआर अहवाल मागवून घेत असतो. मात्र, अहवाल मिळविण्यासाठी दोन दिवस लागत असल्याने रुग्णाची प्रकृतीही खालवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विलंबाची कारणे…

आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल अत्यंत अचूक असणे आवश्यक असते. आरटीपीसीआर चाचणीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढल्याने त्या रुग्णाचे नमुने घेणे, त्याचा अहवाल तयार करणे, त्याचे नाव योग्य आहे का हे तपासणे यासाठी काहीसा वेळ जात असतो. त्यामुळे अहवाल तयार करण्यास उशीर होतो. असे ठाणे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव छापू नये या अटीवर सांगितले.

१५ ते २० दिवसांपूर्वी दिवसाला आमच्याकडे केवळ २०० ते ३०० जण आरटीपीसीआर चाचण्यांसाठी येत होते. गेल्याकाही दिवसांपासून आरटीपीसीआर चाचणीसाठी येणाऱ्यांची संख्या ही दिवाला एक हजार झाली आहे. या चाचण्यांचा अहवाल मिळविण्यास ३६ ते ४८ तास लागत आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीस विदेशात जायचे असेल तर त्याला त्याचा अहवाल मिळविणे कठीण झाले आहे.  – डॉ. राहुल घुले, संस्थापक, वन रुपी क्लिनीक.