वाहनचालक, विद्यार्थ्यांचा खोळंबा; वांगणीच्या विस्तारावर मर्यादा
बदलापूर : कल्याण-कर्जत रेल्वे मार्गावरचे स्थानक असलेल्या वांगणी शहराचा विकास झपाटय़ाने होत आहे. या रेल्वे स्थानकाजवळ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करायला मुहूर्त मिळत नसल्याने वाहनचालक, प्रवासी हैराण झाले आहेत. उड्डाणपूल मंजूर असूनही निधीच्या उपलब्धतेअभावी याचे काम रखडले आहे. काटई -कर्जत राज्यमार्गाने जोडले गेल्याने आणि उल्हास नदी गावातून जात असल्याने वांगणीच्या जागांचा भाव वधारला आहे. त्यामुळे येथे शेकडो शेतघरे, नवनवीन गृह प्रकल्प उभारले जात आहेत. परिणामी वांगणीमध्येही वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. रेल्वे रुळांमुळे वांगणीचे दोन भाग झाले असून पूर्व-पश्चिम प्रवास करण्यासाठी स्थानकाजवळ असलेल्या रेल्वे फाटकाचा अडथळा पार करावा लागतो.
गेल्या काही वर्षांत वाढलेल्या लोकलच्या फेऱ्या, लांब पल्ल्याच्या मेल एक्स्प्रेसची संख्या यांमुळे वांगणीतील हे फाटक वारंवार बंद करण्याची वेळ येते. अनेकदा एकाच वेळी अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गिकांवर रेल्वे गाडय़ा आल्याने फाटक बंद राहण्याचा कालावधी वाढतो. त्यामुळे वाहन चालकांचा अनेकदा खोळंबा होत असतो. त्यामुळे वांगणी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे उड्डाणपूल उभारण्याची मागणी होती. रेल्वे मंत्रालयाने याची घोषणाही केली होती. मात्र याचे काम अजूनही सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे वाहन चालकांची कोंडी होत आहे.
नेमकी समस्या काय ?
वांगणी स्थानकाचा वापर यार्ड म्हणूनही केला जातो. सकाळच्या वेळी बदलापूर स्थानकातून सुटणाऱ्या लोकल वांगणीतून निघतात. त्यामुळे सकाळी मोठा काळ रेल्वे फाटक बंद असते. त्याचा फटका शाळेचे विद्यार्थी, भाजी विक्रेते, शेतकरी, दूध विक्रेते आणि रुग्णवाहिकांना बसतो. या भागात येणाऱ्या पर्यटकांनाही याचा फटका बसतो. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील हेसुद्धा एकदा येथे ३५ मिनिटे अडकल्याचे त्यांनी स्वत: जाहीर कार्यक्रमात सांगितले होते.
केंद्र-राज्य सरकारच्या असमन्वयाचा फटका
वांगणी उड्डाणपुलासाठी ३९ कोटी ५७ लाख २९ हजार रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्याचा खर्च रेल्वे आणि स्थानिक ग्रामपंचायत किंवा राज्य शासनाने भागीदारीत करायचा आहे. तसेच उड्डाणपुलाचा गर्डर वगळता इतर दोन्ही जोडरस्ते व त्यासाठी लागणाऱ्या जागेचा मोबदला ग्रामपंचयातीला द्यायचा आहे. मात्र, हा खर्च ग्रामपंचायतीला परवडणारा नाही. केंद्र आणि राज्यातील समन्वयाच्या अभावामुळे हा उड्डाणपूल रखडला आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र शासनाने यात लक्ष घालण्याची मागणी रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष मनोहर शेलार यांनी केली आहे.
वांगणीचा उड्डाणपूल मंजूर झाला आहे. पुलाच्या दोन्ही बाजू उभारणे राज्य सरकारच्या अखत्यारित असून त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून याची माहिती दिली. लवकरच त्यावर तोडगा निघेल.
– कपिल पाटील, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री