ठाणेकरांच्या घरात जाऊन कचरा गोळा करायचा आणि या कचऱ्याचे पुढे ओला आणि सुका असे वर्गीकरण करायचे, अशी घोषणा करणाऱ्या ठाणे महापालिकेला घंटागाडी ठेकेदाराने दाखविलेल्या वाकुल्यांमुळे सध्या नामुष्की पत्करावी लागत आहे. नौपाडा, पाचपाखाडी, उथळसर, कोपरी अशा भागात घंटागाडीने कचरा गोळा करण्याची महत्त्वाकांक्षी योजना ठेकेदाराच्या असहकारामुळे महापालिकेला गुंडाळावी लागत असून, या परिसरात ‘कचराकोंडी’ होऊ नये यासाठी डंपरच्या सहाय्याने कचरा गोळा करण्यासाठी जुन्याच ठेकेदाराच्या नाकदुऱ्या काढाव्या लागत आहेत. विशेष म्हणजे, कळवा, मुंब्रा आणि शहरातील इतर भागातही घंटागाडीची योजना प्रभावीपणे अमलात आणता येत नसल्याचे चित्र असून, ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरणही त्यामुळे रखडले आहे.
वाढत्या लोकसंख्येपाठोपाठ ठाणे शहरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न अधिकाधिक आ वासू लागला आहे. शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या वसाहतींतील घरांना मालमत्ता करात दहा टक्के सूट देण्याची महापालिकेची योजनाही अपयशी ठरत आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिका हद्दीतील सर्व भागात घंटागाडय़ांद्वारे कचऱ्याचे संकलन करण्याची योजना पालिकेने आखली. घंटागाडीद्वारे घरोघरीचा कचरा गोळा करून त्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करण्याची मूळ योजना होती. मात्र प्रत्येक घरात जाऊन कचरा संकलन करणे शक्य नसल्याने वसाहतींच्या प्रवेशद्वारावरून कचरा गोळा करण्याचे ठरवण्यात आले. यासाठी सहा आणि चार चाकी घंटागाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्याचेही ठरवण्यात आले. नौपाडा, उथळसर आणि कोपरी भागात या योजनेची अंमलबजावणी होणार होती.
जून २०१३मध्ये या कामाची निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर समीक्षा कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले. मार्च २०१४मध्ये कामाचे आदेश काढतानाच ९० दिवसांच्या आत कचरा गोळा करण्यास सुरुवात करावी, अशी सूचना ठेकेदारास देण्यात आली होती. मात्र ९० दिवसांनंतरही काम सुरू न करता ठेकेदाराने आणखी मुदत मागितली. त्यानुसार सहा महिने मुदतवाढ देण्यात आली. मात्र ही मुदत डिसेंबर २०१४मध्ये संपल्यानंतरही कचरा गोळा करण्याचे काम सुरू झालेले नाही.
वारंवार मुदतवाढ देऊनही घंटागाडय़ा पुरविण्यात असफल ठरलेल्या मेसर्स समीक्षा कन्स्ट्रक्शन कंपनीस काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घनकचरा विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे नौपाडा आणि परिसरात अभूतपूर्व अशी कचराकोंडी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नव्या ठेकेदारास काम दिल्याने यापूर्वी डंपरद्वारे काम करणारा ठेके दार हे काम करण्यास फारसा उत्सुक नाही. त्यामुळे महापालिका दुहेरी संकटात सापडली आहे. दरम्यान समीक्षा कन्स्ट्रक्शन कंपनीस काळ्या यादीत टाकून तातडीने नव्याने निविदा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या प्रक्रियेदरम्यान कचऱ्याचे संकलन थांबू नये, यासाठी जुन्याच ठेकेदारास तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, घंटागाडी नव्हे तर डंपरद्वारे कचरा गोळा करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Mar 2015 रोजी प्रकाशित
घंटागाडी योजनेची ऐशीतैशी!
ठाणेकरांच्या घरात जाऊन कचरा गोळा करायचा आणि या कचऱ्याचे पुढे ओला आणि सुका असे वर्गीकरण करायचे, अशी घोषणा करणाऱ्या ठाणे महापालिकेला घंटागाडी ठेकेदाराने दाखविलेल्या वाकुल्यांमुळे सध्या नामुष्की पत्करावी लागत आहे.

First published on: 10-03-2015 at 08:04 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waste collection alarm vehicle in thane