शलाका सरफरे रेल्वे हद्दीतील कचऱ्याकडे पालिकेचे दुर्लक्ष रुळांशेजारी लागलेल्या कचऱ्याच्या ढिगामुळे गलिच्छ बनलेल्या पारसिक बोगद्याची स्वच्छता करण्याची मोहीम ठाणे महापालिकेने गाजावाजा करत सुरू केली खरी; पण हद्दीच्या वादामुळे ही स्वच्छता मोहीम कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. बोगदा आणि त्याच्या शेजारील परिसर पालिकेने रोबोटिक यंत्रणेच्या साह्य़ाने स्वच्छ केला, परंतु रेल्वेच्या हद्दीत असलेला शेकडो टन कचरा अजूनही तिथेच पडून आहे. त्यामुळे एकीकडे बोगद्याशेजारचा परिसर स्वच्छ झाला असताना रेल्वेमार्गावर मात्र कचऱ्याचे ढीग नव्याने साचू लागले आहेत. पारिसक बोगद्याच्या दोन्ही बाजूला मोठय़ा प्रमाणात झोपडय़ा उभारण्यात आल्या आहेत. या झोपडय़ांतून निर्माण होणारा कचरा उचलण्यासाठी पालिकेच्या घंटागाडय़ा तेथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे झोपडीवासीय घरातील कचरा थेट रेल्वेमार्गालगत फेकतात. यामुळे पारसिक बोगद्याचा परिसर गलिच्छ झाला असून रेल्वेमार्गावरील कचऱ्यामुळे अपघाताचीही भीती व्यक्त होत आहे. पारसिक बोगद्यालगत कचरा साचून रुळांवर येऊ नये, यासाठी रेल्वेने या ठिकाणी दोन्ही बाजूस संरक्षक भिंत उभारावी, असा प्रस्ताव पालिकेने ठेवला आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, रेल्वेमार्गावरील कचरा न उचलण्याचा निर्णय पालिकेने घेतला. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर या भागामध्ये रोबोटिक यंत्रणेच्या मदतीने सुमारे दीडशे टनाहून अधिक कचरा हटवण्यात आला आहे. त्यामुळे हा परिसर स्वच्छ झाला आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी काही दिवसांपूर्वी या भागात भेट दिली असून हा भाग स्वच्छतेचे प्रतीक बनेल असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु या भागातील झोपडय़ांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसंदर्भात अद्याप कोणताही ठोस पर्याय नसल्यामुळे हा कचरा पुन्हा याच भागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे डोंगर उतारावर झोपडय़ांमधील कचरा उचलण्याची महापालिकेची प्रक्रियाही रेंगाळली असल्यामुळे येथील कचऱ्याचे संकट कायम असल्याचे कळवा पारसिक रहिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेची उदासीनता पालिका आणि रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने पारसिक बोगदा स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या हद्दीतील कचरा उचलला गेला असला तरी रेल्वेकडून अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. रेल्वेच्या हद्दीतील कचरा अद्याप तसाच पडून आहे. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या जलद लोकल गाडय़ा तसेच लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधील प्रवाशांना दरुगधीचा तसेच गलिच्छपणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे रेल्वे पारसिकबोगद्याच्या कडा कधी स्वच्छ करणार, असा सवाल प्रवासी करत आहेत.