कचरा वेचक महिलांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष
पोटापाण्यासाठी रात्रंदिवस आधारवाडी कचराभूमीवर राबणाऱ्या काही कामगारांसाठी मंगळवारची दुपार भयावह ठरली. कचरा गोळा करत असताना लहानगा स्फोट झाल्याचा आवाज आला आणि लगोलग आगही लागली. आग लागल्याचे दिसताच काही कचरा वेचक महिलांनी धावत जाऊन सुरक्षा रक्षकांना माहिती दिली. अग्निशमन विभागाला पाचारण करा, अशी विनंतीही करून पाहिली. मात्र, मुजोर सुरक्षा रक्षकांनी आगीचा चटका बसलेल्या हाताला ‘चुना लावा आणि आग लागल्याचे हाकारे पिटत पळा’, असा सल्ला देत या महिलांची मस्करी उडवल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस येऊ लागला आहे. ‘आमची सूचना ऐकली असती तर कल्याण धुरात काळवंडले नसते’, अशी प्रतिक्रिया साठेनगरातील या महिला देत होत्या.
या आगीची झळ साठेनगरमधील रहिवाशांना बसली असून काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. घरात सर्वत्र धूर पसरल्याने नागरिकांनी संपूर्ण रात्र उपाशी रस्त्यावर बसून काढली. पोटाचा प्रश्न असल्याने दुसऱ्या दिवशी आग घुमसत असूनही येथील कामगार कचरा वेचण्याचे काम करीत होते. या आगीच्या निमित्ताने साठेवाडीतील कामगारांचे जगण्याचे भीषण वास्तव पुन्हा एकदा उघड झाले असून सुविधांअभावी कचऱ्याचे हे जिणे थांबणार कधी, असा सवाल या वस्तीतून विचारला जात आहे.
लालचौकी येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळील सुमारे १५० ते २०० घरे असलेली वस्ती महापालिका प्रशासनाने १९९५ साली आधारवाडी येथील कचराभूमीजवळ हलवली. तेव्हापासून येथील नागरिकांची परवडच सुरू आहे. कचराभूमीवरील कचरा वेचण्याचे काम करून हे नागरिक आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी दुपारी कचरा वेचत असताना तीनच्या सुमारास त्यांना कचऱ्यात लहानसा स्फोट झाल्याचा आवाज आला. त्यावेळी कचऱ्याला लहानगी आगही त्यांना दिसली. यापैकी काही कामगारांनी लागलीच ही घटना सुरक्षा रक्षकांच्या कानावर घातली. काही कचरा वेचक महिलांनी अग्निशमन विभागास पाचारण करा अशी विनंतीही सुरक्षा रक्षकांकडे केली. मात्र, काही सुरक्षा रक्षकांनी चटका बसलेल्या हाताला चुना लावा आणि आग लागल्याचे हाकारे पिटत पळा असा अजब सल्ला या महिलांना दिल्याची माहिती यापैकी काहींनी ठाणे लोकसत्ताला दिली. दरम्यानच्या काळात जोराची हवा सुटली आणि साडेचारच्या सुमारास आगीने रौद्ररूप धारण केले. यात कचऱ्यातील प्लॅस्टिक अंगावर उडाल्याने आशा आडागळे (३५), मंगल रामनाडे (२५) व दीपक घौडे (१६) हे किरकोळ जखमी झाले आहेत. तर अरुण जगताप या मुलाला चक्कर आल्याने त्याला खासगी रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले.
आगीने रौद्ररूप धारण केल्याने आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोटच्या लोट पसरले होते. काळ्या धुरात बाजूला कोण उभे आहे हेही दिसत नव्हते. अशाच परिस्थितीत नागरिक येथे राहात होते. धुराचे लोट घरात शिरल्याने येथील शशांक बालविहार प्राथमिक शाळेने आपल्या शाळेतील आठ वर्गखोल्या येथील नागरिकांना रात्र काढण्यासाठी खुल्या करून दिल्या. काहींना या शाळेतील वर्ग खोल्यांमध्येही जागा मिळाली नाही. त्यामुळे यापैकी अनेकांनी रस्त्यावर अख्खी रात्र जागून काढली. महापालिका प्रशासनाने या नागरिकांची कोणतीही सोय केली नाही. तसेच त्यांच्या जेवणाचीही सोय केली नाही, असे येथील नागरिक भुजंग कांबळे यांनी सांगितले. शोभा लोंढे यांचाही पाय यात भाजला असून पाच दिवसाच्या बाळालाही धुराचा प्रचंड त्रास झाल्याचे त्याची आई उषा साबळे यांनी सांगितले.
प्रोबेस कंपनीचा कचरा आधारवाडीत?
डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीतील स्फोटाचा गोळा केलेला कचरा हा कल्याण आधारवाडी कचराभूमीवरील एका भागात टाकण्यात आला आहे. हा कचरा येथे टाकण्यास कोणी परवानगी दिली याविषयी प्रश्नचिन्ह असतानाच कचऱ्याला आग लागण्याच्या आधी एका डब्यातून लहानशा स्फोटाचा आवाज आल्याचे येथील कामगार सांगत असल्याने या कचऱ्याशी या आगीचा काही संबंध नाही ना, अशी चर्चा रंगू लागली आहे.
आग लागल्याने त्या आगीत आमची एक दिवसाची पूर्ण मेहनत वाया गेली आहे. १०० कामगार येथे काम करत असून दिवसाला एक जण पाचशे ते सहाशे रुपयांचा माल गोळा करतात. परंतु आमचा एक दिवसाचा माल पूर्ण जळून गेला. जर काम केले नाही तर खायचे काय म्हणून एकीकडे आग विझवली जात असताना दुसरीकडे हे कामगार कचरा वेचत होते.
राजू ढगे, कचरावेचक