कल्याण-डोंबिवली पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

भगवान मंडलिक 

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील घनकचऱ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करता यावे यासाठी महापालिका प्रशासनाने ५० सदनिका असलेल्या गृहप्रकल्पांना यापुढे सोसायटीच्या आवारात कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १०० सदनिकांच्या गृहप्रकल्पांवर हे बंधन होते. हे निकष यापुढे ५० सदनिकांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

महापालिका हद्दीतील दररोज ६५० टन इतका कचरा निर्माण होत असतो. त्यापैकी ८० टक्के कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण केले जाते. याशिवाय कचऱ्याचे १६ प्रकार करून ते आठवडय़ातून ठरलेल्या दिवशी रहिवाशांकडून महापालिका ताब्यात घेते. रहिवाशांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील १०० सदनिका असलेल्या सोसायटय़ांनी स्वत:चे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प राबवावेत, असा निर्णय महापालिकेने यापूर्वीच घेतला आहे. तरीही काही सोसायटय़ांनी प्रक्रिया प्रकल्प उभारले नाहीत. त्यांचा कचरा पालिकेने उचलणे बंद केले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या सततच्या पाठपुराव्यामुळे १०० सदनिका असलेल्या ३२ सोसायटय़ांनी प्रकल्प उभारून कचऱ्यावर प्रक्रिया सुरू केली आहे. सोसायटय़ांच्या प्रकल्पांमुळे ५० टन कचरा पालिकेकडे येणे बंद झाले आहे, असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

आता ही मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी पालिकेने ५० सदनिका असलेल्या सोसायटय़ांना कचरा विल्हेवाट प्रकल्प सक्तीचे केले आहेत. या सोसायटय़ांना कचरा प्रक्रिया उभारणीसाठी पालिका सहकार्य करेल. या सोसायटय़ांना प्रकल्प उभारणीसाठी मुदत दिली जाईल. त्यांच्या अडचणी घनकचरा विभागाचे अधिकारी समजून घेतील, असे आयुक्तांनी सांगितले.  एक लाख ३५ हजार मालमत्तांपैकी ३० ते ३५ हजार मालमत्ता ५० सदनिकांच्या असण्याची शक्यता एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.

‘एमसीएचआय’ची तयारी

आधारवाडी कचराभूमी यशस्वीरीत्या बंद, शहर कचरामुक्त होत असेल तर ५० सदनिका असलेल्या सोसायटय़ांना पालिकेने कचरा प्रकल्प राबविण्यासाठी आग्रह केला असेल तर त्याचे स्वागत आहे, असे मत ‘एमसीएचआय’चे माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी व्यक्त केले. यापुढील काळात पालिकेच्या नगररचना विभागाकडे ५० सदनिका असलेल्या इमारत उभारणीचे जे नवीन आराखडे मंजुरीसाठी दाखल होतील. त्या प्रत्येक आराखडय़ाला मंजुरी देताना प्रशासनाने त्या आराखडय़ात विकासकाला कचरा विल्हेवाट प्रकल्प सोसायटी आवारात राबविण्यासाठी जागा निश्चित करून द्यावी. त्यामुळे इमारत बांधकाम होत असतानाच सोसायटी आवारात कचरा विल्हेवाट प्रक्रियेची उभारणी झाली असेल. इमारत उभारणीच्या एका खर्चात हा प्रकल्प उभा राहील. रहिवाशांना नव्याने या प्रकल्प उभारणीसाठी खर्चाची गरज नाही. या प्रकल्पाची अंमलबजावणी रहिवाशांनी योग्यरीतीने करावी, असे पाटील म्हणाले.

गेल्या दीड वर्षांत शहरवासीयांनी दिलेल्या सहकार्यामुळे कल्याण-डोंबिवली, टिटवाळा शहरे कचरामुक्त होत आहेत. विभागवार शास्त्रोक्त कचरा विल्हेवाट प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. यापुढे त्या भागातील त्या कचरा त्या परिसरातील भूखंडावर, कचरा विल्हेवाट प्रकल्पात विघटित केला जाईल.

डॉ. विजय सूर्यवंशी, कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त