ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणीपुरवठा तात्काळ खंडीत करा, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. या आदेशानंतर २५ जुलैपासून पाणी पुरवठा विभागाने अशा इमारतींचा शोध घेऊन त्यांच्या नळजोडण्या तोडण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत गेल्या सहा दिवसांत संपूर्ण शहरातील १३४ अनधिकृत बांधकामांच्या नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. याशिवाय, बोअरवेल बंद करण्याबरोबरच मोटर पंप जप्त करण्यात आले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत इमारती उभारण्यात येत आहेत. या इमारतींना वीज आणि पाणी पुरवठा होत असल्याने येथे रहिवाशी वास्तव्यास येतात. या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी देताना उच्च न्यायालयाने अशी बांधकामे उभी राहू नयेत यासाठी महत्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यात कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज आणि पुरवठा करण्यात येऊ नये, असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. या आदेशानुसार अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणीपुरवठा तात्काळ खंडीत करा, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. यानुसार, पाणी पुरवठा विभागाने अशा इमारतींचा शोध घेऊन त्यांच्या नळजोडण्या तोडण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे.

शहरातील कोणत्या भागात कारवाई

ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची नळ जोडणी खंडित करण्याची विशेष मोहीम २५ जुलैपासून हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत दिवा, मुंब्रा, माजिवडा-मानपाडा, कळवा, उथळसर, लोकमान्य नगर-सावरकर नगर या प्रभाग समिती क्षेत्रात पाहणी करून कारवाई करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता (पाणी पुरवठा विभाग) विनोद पवार यांनी दिली. या मोहिमेत अर्धवट बांधकाम असलेल्या तसेच व्याप्त असलेल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी करून तेथील नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. पंपही जप्त करण्यात आले असून बोअरवेलही बंद करण्यात आल्या आहेत.

कारवाईची आकडेवारी

२५ जुलै रोजी ४ नळजोडण्या खंडित तर, ७ बोरवेल बंद करण्यात आल्या. २६ जुलै रोजी १० नळजोडण्या खंडित तर, ४ बोरवेल बंद करण्यात आल्या. याशिवाय, १० पंप जप्त केले आहेत. २८ जुलै रोजी २८ नळजोडण्या खंडित केल्या. १९ बोरवेल बंद तर, २ पंप जप्त केले आहेत. २९ जुलै रोजी ३१ नळजोडण्या खंडित केल्या. १५ बोरवेल बंद तर, २ पंप जप्त केले आहेत. ३० जुलै रोजी ३४ नळजोडण्या खंडित केल्या. ११ बोरवेल बंद तर, १ पंप जप्त केले आहेत. ३१ जुलै रोजी २७ नळजोडण्या खंडित केल्या. २३ बोरवेल बंद तर, ३ पंप जप्त केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रहिवाशांचे धाबे दणाणले

ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या १३४ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. या कारवाईदरम्यान, ७९ बोअरवेल बंद करण्यात आल्या आहेत. तर, १८ मोटर पंप जप्त करण्यात आले आहेत. या सर्व नळ जोडण्या अनधिकृतपणे घेण्यात आल्याची बाब कारवाईदरम्यान समोर आली आहे. त्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाईही करण्यात येत आहे. यामुळे अनधिकृत इमारतीमधील रहिवाशांचे धाबे दणाणले आहेत.