बदलापूरः बदलापूर शहराच्या महावितरणाच्या खेळखंडोब्याचा परिणाम बदलापुरकरांवर झालेला असताना त्याचा फटका शहरातील पाणी व्यवस्थेलाही बसला आहे. त्यातच गेल्या तीन महिन्यांपासून पडणाऱ्या पावसामुळे पाण्याची गढुळता वाढली आहे. त्यात नव्याने उभारण्यात आलेल्या जवाहरलाल नेहरू बंदर ते बडोदे महामार्गाच्या उभारणीत झालेल्या खोदकामातील माती जलवाहिन्यांमध्ये शिरल्याने त्याची क्षमता २० टक्क्यांनी कमी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बदलापुरात भर पावसाळ्यात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
बदलापूर आणि अंबरनाथ शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही शहरांची पाणीपुरवठा योजना जवळपास १०० वर्ष जुनी आहे. जुनाट झालेल्या या वितरण व्यवस्थेत जीर्ण वाहिन्यांमुळे तसेच विकास कामांमुळे दररोज कुठे ना कुठे फुटण्याचे प्रकार घडतात. तसेच रोजच कुठे तरी पाणी गळती होत असते. यंदाच्या वर्षात मे महिन्यापासून पावसाला सुरूवात झाली. तेव्हापासून पाण्याची गढुळता वाढली. त्यात शहरात दररोज रोज कमीत कमी ३ ते ४ वेळा वीज पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे पंपीग यंत्रणा बंद होऊन पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे.
त्यातच बदलापूर शहराच्या वेशीवर जवाहरलाल नेहरू बंदर ते बडोदे या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या कामात मोठ्या प्रमाणावर खोदकाम झाले. यासाठी मोठी माती वाहतूक करण्यात आली. हीच माती पावसाच्या पाण्यात वाहून बदलापूर शहरातील जलवाहिन्यांमध्ये शिरल्याची माहिती समोर आली आहे. या जलवाहिन्यांमध्ये शिरलेल्या मातीमुळे जलवाहिन्यांची पाणी वहन क्षमता घटली असून रोज २० टक्क्यांपर्यत कमी पाणीपुरवठा होत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे जलकुंभांची क्षमता ठरलेल्या वेळेत पूर्ण होत नसल्याने वेळेच्या नियोजनामुळे कमी दाबात पाणी सोडण्यात येते. परिणामी जलकुंभांपासून दूर अंतरावर असणाऱ्या भागांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे दररोज एखादा भाग वगळून उर्वरित भागाला पाणी पुरवठा करण्याचे नियोजन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुरू केले आहे. सोमवार ते रविवार दररोज पूर्व आणि पश्चिमेतील जलकुंभानुसार एका भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
जोडण्या वाढल्या, पाणी मात्र कमीच
बदलापूर शहरात गेल्या वर्षभरात १ हजार नवीन पाणी जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. तसेच अजुन ५०० नवीन जोडण्या देेणे प्रस्तावित आहेत. त्यासाठी जवळजवळ २.५ दशलक्ष लीटर पाणी अतिरिक्त लागणार आहे. त्यात नवीन योजना अजून सुरु झालेली नाही. सध्या बदलापुर शहराला फक्त ५० दशलक्ष लीटर पाणी मिळते. त्यामुळे अतिरिक्त २.५ दशलक्ष लीटर पाणी देण्यासाठी यंत्रणेवर ताण येत आहे, अशी बाब जीवन प्राधिकरणाने वरिष्ठांना कळवली आहे.
पाणी व्यवस्थापन केल्यास कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याची ओरड कमी होईल. त्यानुसार आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरुन सर्व भागांना आठवड्यातुन कमीत कमी ६ दिवस व्यवस्थितरित्या पाणीपुरवठा करता येईल. – सुरेश खाद्री, उपविभागीय अधिकारी, म.जी.प्रा. बदलापूर.