डोंबिवली – येथील औद्योगिक विभागात शिळफाटा रस्त्यालगत ६०० मिलिमीटर व्यासाची एमआयडीसीची जलवाहिनी बुधवारी रात्री फुटली. शेकडो लीटर पाणी वाया गेले. एमआयडीसी अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेऊन गुरुवारी सकाळी जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण करून पाणी पुरवठा सुरू केला.
हेही वाचा >>> ठाण्यात भुमिगत जलवाहिनी फुटली; वागळे इस्टेटच्या काही भागांचा पाणी पुरवठा ठप्प
जलवाहिनी फुटल्याने गुरुवारी सकाळी एमआयडीसी निवासी, औद्योगिक विभाग, २७ गाव परिसराला पुरेशा दाबाने पाणी पुरवठा झाला नाही. नियमित सकाळच्या वेळेत येणारे पाणी गुरुवारी सकाळी आले नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागले. कार्यालयात जाण्याची वेळ आणि त्यात घरात पाणी नाही. यामुळे नागरिकांचे हाल झाले. मागील दोन वर्षाच्या काळात काटई, खिडकाळी, देसई परिसरात जलवाहिनी फुटण्याच्या सहा घटना घडल्या होत्या. चालू वर्षात प्रथमच सागाव जवळील महानगर गॅस भागात एमआयडीसीची जलवाहिनी फुटली. या वर्षातील जलवाहिनी फुटीची ही पहिली घटना आहे. जलवाहिनी गुरुवारी सकाळी दुरूस्त केल्यानंतर घरांमध्ये गढून पाणी आल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.