टँकरच्या पाण्यावर नागरिकांची भिस्त; ५०० लीटर पाण्यासाठी अडीचशे रुपये दर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशीष धनगर, ठाणे</strong>

ठाणे शहरासह जिल्ह्यातील सर्व शहरांचे जलस्रोत असलेल्या धरणक्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे जनतेवरील पाणीकपातीचे संकट कमी झाले असले तरी, दिवा परिसरातील पाणीटंचाई कायम आहे. पावसाळा सुरू असतानाही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने दिवावासियांना टँकरद्वारे येणारे पाणी खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे टँकरमाफियांचा व्यवसाय तेजीत सुरू असून दिव्यात ५०० लीटर पाण्यासाठी अडीचशे रुपये आकारले जात आहेत.

दिवा शहराची लोकसंख्या सात लाखांच्या आसपास आहे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार या परिसरात दररोज २७ दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात शहरात १०-११ दशलक्ष लीटर पाण्याचा प्रतिदिन पुरवठा होत आहे. त्यातच शहरात उभारण्यात आलेल्या बेसुमार बेकायदा बांधकामांमध्ये चोरून नळजोडणी देण्यात आल्यामुळे अधिकृत घरांना पुरेसा पाणीपुरवठा होतच नाही.

मुंब्रा देवी कॉलनी सिध्दीविनायक गेट परिसर, ओंकार नगर, क्रिश नगर भागातील अनेक इमारतींमध्ये पाणी पोहोचत नसल्याने येथील नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. ५०० लीटर पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना २५० रूपये मोजावे लागत आहे. हे पाणी आठवडय़ाभरातच संपते. त्यामुळे पुन्हा टँकर चालकाला बोलावून पाणी भरावे लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यासंदर्भात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता अर्जून अहिरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सफल होऊ शकला नाही.

जिल्ह्य़ात चांगला पाऊस झाला असला तरी दिवा शहरात पावसाळ्यातही पाणी टंचाई कायम आहे. अनेक इमारतींमधील नागरिक हे टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, महापालिका प्रशासन आणि नगरसेवक याकडे दुर्लक्ष करत आहेत.

– विजय भोईर, रहिवासी दिवा 

लोकलमधून पाण्याची आवक

दिवा शहराच्या पश्चिमेकडील भागांत पाणीटंचाई तीव्र आहे. त्यामुळे येथील रहिवासी मुंब्रा स्थानकाजवळ असणाऱ्या नळांवरून पाणी भरूण आणतात. दुपारी लोकलमध्ये गर्दी कमी असताना हंडे, प्लॅस्टिकचे डबे, बादल्या घेऊन प्रवास करणारे दिवावासीय रेल्वे डब्यांत हमखास पाहायला मिळत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water scarcity in diva during rainy season zws
First published on: 31-07-2019 at 01:20 IST