कल्याण – दोन दिवसांपासून कल्याण पश्चिमेचा पाणी पुरवठा ठप्प होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्या पालिकेच्या केंद्रावर नागरिकांची झुंबड उडाली होती. तात्काळ टँकर मिळत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. दिवसभर नागरिकांनी पालिका पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना संपर्क करून भंडावून सोडले. अखेर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास कल्याण पश्चिमेचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.
कल्याण पश्चिम शहराला पाणी पुरवठा करणारी सुमारे तीस वर्षाहून अधिक काळाची एक जलवाहिनी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील महम्मद अली चौकातून गेली आहे. ही वाहिनी पुष्पराज हाॅटेल समोर आहे. ही जलवाहिनी पालिका स्थापनेच्याआधी टाकली असण्याचा अंदाज आहे. या जलवाहिनीच्या बाजुला काँक्रीटचा थर आहे. वाहिनी जुनाट झाल्याने आणि वाहिनीच्या तुलनेत पाणी वहन क्षमतेचा भार अधिक असल्याने महम्मद अली चौकातील जुनाट जलवाहिनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास काँक्रीटच्या अति भाराने फुटली. ही वाहिनी भूमिगत असल्याने जलवाहिनी फुटल्याचे पाणी पुरवठा विभागाच्या तात्काळ निदर्शनास आले नाही. सोमवारी हा प्रकार अधिकाऱ्यांच्या लक्षात आला.
चौकात खोदकाम करून फुटलेल्या जलवाहिनीचा भाग शोधण्यात आला. जलवाहिनी सुमारे तीस वर्षापूर्वीची असल्याने तशा प्रकारची जलवाहीनी पालिकेकडे तसेच बाजारात उपलब्ध नव्हती. त्यामुळे फुटलेली जलवाहिनी जोडण्याचे मोठे आव्हान पाणी पुरवठा अधिकाऱ्यांसमोर उभे राहिले. अधिकाऱ्यांनी फुटलेल्या जलवाहिनीला जोडण्यासाठी बाजारात नवीन वाहिनीची चौकशी केली. काही ठेकेदारांकडे संपर्क करण्यात आला. पण त्या आकाराची जलवाहिनी मिळाली नाही.
या वाहिनीवरून कल्याण पश्चिमेला पाणी पुरवठा होत असल्याने कल्याण पश्चिमेचा पाणी पुरवठा ठप्प झाला. पाणी येईल या आशेवर असलेल्या नागरिकांना दोन दिवस पाण्यासाठी वाट पाहावी लागली. पालिकेकडून टँकर मिळविण्यासाठी नागरिकांची टँकर पुरवठा केंद्रावर झुंबड उडाली. तेथे शेकडो चिठ्ठया टँकर पुरवठ्यासाठी जमा झाल्या होत्या. काही ओळखीच्या पालिका अधिकाऱ्यांच्या सोसायटीत मात्र या पाणी पुरवठा केंद्रावरून टँकर पाठविण्यात आले. मग आम्हाला असे टँकर का तात्काळ देण्यात येत नाहीत असे प्रश्न इतर नागरिकांनी केले.
काही नागरिकांनी दिवा, कोन, भिवंडी परिसरातील खासगी पाणी पुरवठादारांशी संपर्क साधून घरात तात्पुरत्या पाणी पुरवठ्याची सोय करून घेतली. काहींनी दुकानात जाऊन पाण्याचे चार ते पाच बाटले (जार) विकत आणले. त्यामधून घरातील पाण्याची तहान भागविण्याचा प्रयत्न केला. नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत असताना पाणी पुरवठा अधिकारी जुनाट जलवाहिनीच्या आकाराची नवीन वाहिनी मिळत नसल्याने हैराण होते.
अखेर अधिकाऱ्यांनी उपलब्ध वाहिनी वेल्डिंगच्या साहाय्याने जोडून फुटलेल्या जलवाहिनीला जोडण्याचे काम मंगळवारी रात्री पूर्ण केले. मध्यरात्रीनंतर कल्याण पश्चिमेचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. बुधवारी सकाळी नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी मिळाले. पालिकेने नगरपालिका काळातील जलवाहिन्या बदलून त्या ठिकाणी नवीन वाहिन्या टाकण्याची कामे हाती घेण्याची मागणी जुन्या जाणत्या अभियंत्यांकडून केली जात आहे.