ठाणे : अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा देऊ नका, असे स्पष्ट निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महावितरण आणि टोरॅंट या दोन्ही वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना बैठकीत दिले. त्यापाठोपाठ आता अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणीपुरवठा तात्काळ खंडीत करा, असे निर्देश आयुक्त राव यांनी पाणी पुरवठा विभागाला दिले आहेत. तसेच बोअरवेलवरही कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. याशिवाय अनधिकृत बांधकामांना कागदपत्रे तपासणीविना नळजोडणी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत इमारती उभारण्यात येत आहेत. या इमारतींना वीज आणि पाणी पुरवठा होत असल्याने येथे रहिवाशी वास्तव्यास येतात. परंतु अनधिकृत बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या असून त्यावर सुनावणी देताना अशी बांधकामे उभी राहू नयेत यासाठी महत्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यात कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज पुरवठा करण्यात येऊ नये तसेच, वीज पुरवठा करताना संबंधित बांधकाम अधिकृत असल्याची खातरजमा वीज कंपन्यांनी करावी, असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. या आदेशाचे पालन व्हावे अशी सूचना ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महावितरण आणि टोरॅंट या दोन्ही वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना बैठकीत केली. त्यापाठोपाठ आता अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणीपुरवठा तात्काळ खंडीत करा, असे निर्देश आयुक्त राव यांनी पाणी पुरवठा विभागाला दिले आहेत.
पाणी पुरवठा खंडीत करण्यामागचे कारण
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शिळ येथील अनधिकृत बांधकामाच्या पाणी पुरवठ्याबाबत उच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान अनधिकृत बांधकामांना होत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने तपास करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले आहेत. या आदेशाचे पालन करण्यासाठी आयुक्त राव यांनी गुरुवारी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक घेतली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (अतिक्रमण विभाग) शंकर पाटोळे, विधी अधिकारी मकरंद काळे, उपनगर अभियंता विनोद पवार, सहाय्यक आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आयुक्तांनी काय आदेश दिले
या बैठकीमध्ये अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा दिला असल्यास त्याची कागदपत्रे तपासण्यात यावी. बांधकाम अवैध असल्यास नळ जोडणी तात्काळ खंडीत करण्यात यावी, त्याचप्रमाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरुन अवैधरित्या नळजोडणी घेतली असल्यास ते तात्काळ खंडीत करावे. तसेच यापुढे महापालिकेच्या बांधकाम परवानगी शिवाय कोणत्याही अनधिकृत बांधकाम नळजोडणी दिली जाणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी. यापूर्वी जी नळजोडणी दिली आहे, ती तात्काळ खंडीत करण्यात करण्याचे आदेशही आयुक्तांनी संबंधितांना बैठकीत दिले.
अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत
अनधिकृत बांधकामांना कागदपत्रे तपासणीविना नळजोडणी दिली असेल तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही आयुक्त सौरभ राव यांनी दिले. ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभागसमिती क्षेत्रातील अनधिकृत इमारतींना परवानगीसह आणि परवानगी शिवाय देण्यात आलेल्या नळसंयोजनाची यादी तयार करुन त्यानुसार देण्यात आलेली सर्व नळजोडण्या तोडून टाकण्यात यावी तसेच अनधिकृतपणे तयार केलेल्या बोअरवेलवरही कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी दिले.