डोंबिवली – आम्ही शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे पाईक आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्यामुळे ठाकरे घराण्याशी आमचे निष्ठेचे नाते आहे. ज्या दूरगामी विचारातून पक्षप्रमुखांनी माझ्यावर कल्याण लोकसभा उमेदवारीची जबाबदारी टाकली आहे. ती जबाबदारी पूर्ण ताकदीने पूर्ण करू. समोर कितीही तुल्यबळ उमेदवार असला तरी आम्ही आमच्या ताकदीने ही निवडणूक लढणार आणि जिंकणार पण, असा विश्वास कल्याण लोकसभेतील ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

कल्याण लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी यापूर्वी आम्ही जीवाचे रान केले आहे. त्यामुळे येथील प्रत्येक शिवसैनिक, कार्यकर्ता हा निष्ठावान आहे. या निष्ठावान शिवसैनिकांच्या ताकदीने कल्याण लोकसभेतील प्रचाराला आम्ही सुरुवात करू. एक दिलाने काम करून जिंकून येऊ, असा विश्वास वैशाली दरेकर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – प्रस्तावित पोशीर धरणाच्या बुडित क्षेत्र, माती सर्वेक्षणाला लवकरच प्रारंभ

निवडणुकीत तुल्यबळ वगेरे शब्द वापरले जात असले तरी, तुल्यबळ कोणीही नसतो. खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे हे सुरुवातीला सामान्य नागरिक होते. राजकारणात नव्याने दाखल झाले होते. त्यावेळी त्यांना खासदार करण्यासाठी आम्ही शिवसैनिकांनी जीवाचे रान केले होते. त्यानंतर ते विजयी होऊन खासदार झाले. त्यामुळे खासदार शिंदे आपल्या समोर तुल्यबळ उमेदवार आहेत, असे आपणास अजिबात वाटत नाही, असे उमेदवार वैशाली दरेकर यांंनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिलो, कारण आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक आहोत. त्यांच्या निष्ठेनेच आम्ही चालणार आहोत. त्यामुळे फुटीनंतर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणे पसंत केले. कारण ते आमचे दैवत आहेत. आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी राहणार आहोत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक नक्की जिंकू, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात यापूर्वी प्रचार कार्याला सुरुवात केली आहे. शिवसैनिक, महिला संघटना आपल्या पद्धतीने प्रचार कार्य करत आहेत. यापूर्वी फक्त उमेदवार नक्की नव्हता. आता आपले नाव जाहीर झाल्याने आपल्या नावाने या मतदारसंघात जोमाने प्रचार कार्य सुरू होईल, असे दरेकर यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुल्यबळ हे फक्त नामाभिधान आहे. प्रत्येक जण सामान्यच असतो. श्रीकांत शिंदे यांना यापूर्वी आम्हीच जीवाचे रान करून निवडून आणले आहे. त्यामुळे ते पूर्वी सामान्यच होते. त्यामुळे कल्याण लोकसभेची लढत आपणास अजिबात तुल्यबळ वाटत नाही. ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढू आणि जिंकू सुद्धा. – वैशाली दरेकर, उमेदवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे, कल्याण लोकसभा मतदारसंघ.