डॉ. विजय सूर्यवंशी,

आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आरोग्य व्यवस्थेबाबत नागरिकांकडून नेहमीच तक्रारी येत होत्या. करोना साथीच्या सुरुवातीच्या काळात तर आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी अधिक प्रकर्षाने जाणवू लागल्या. मात्र, गेल्या वर्षभरात महापालिका प्रशासनाने शहरातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर भर दिला आहे. करोनाच्या संकटालाच नव्हे, तर भविष्यातील सर्व आरोग्य आव्हानांना तोंड देणारी व्यवस्था निर्माण करण्याचा मानस महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.

’ कल्याण-डोंबिवली पालिकेची आर्थिक परिस्थिती कशी आहे?

करोना साथीचा काळ असुन गेल्या वर्षी ४५० कोटीची विक्रमी मालमत्ता कर वसुली झाली. या निधीचा करोना सुविधा उभारणीसाठी हातभार लागला. तीन महिन्यात ५२ कोटीची कर वसुली झाली. पाणी देयक वसुलीला चांगला प्रतिसाद आहे. शासनाकडून ‘जीएसटी’ची रक्कम मिळतेय. त्यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती सुस्थितीत आहे.

 

’ प्राधान्याने कोणती विकास कामे हाती घेतली आहेत?

आरोग्य व्यवस्था सुसज्ज ठेवा हा मोठा धडा करोना विषाणूने शिकवला. येत्या काळात महामारीच काय, आरोग्याचे कोणतेही अचानक संकट आले तरी त्यास पालिकेची आरोग्य व्यवस्था सक्षमपणे तोंड देऊ शकेल अशी वैद्यकीय व्यवस्था उभी करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. ३० वर्षात शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई रुग्णालयांची रुग्णशय्या क्षमता १३० पर्यंत होती. आता रुक्मिणीबाई रुग्णालयात उपलब्ध जागेत ८० रुग्णशय्या वाढविण्याचे नियोजन आहे. या दोन्ही रुग्णालयात २५ अतिदक्षता विभाग सुरू केले आहेत. वसंत व्हॅली ७०, रुक्मिणी प्लाझा ८०, विठ्ठलवाडी १२०, शक्तिधाम १३० अशी ४०० रुग्णशय्येची कायमस्वरूपी रुग्णालये सुरू केली आहेत. नागरीकरण, लोकसंख्येचा विचार करून सध्याची १५ आरोग्य केंद्रे कमी पडतात. २१ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे प्रभागवार सुरू करणार आहोत. १३ आरोग्य केंदे्र लवकरच सुरूहोतील. ११ केंद्रांसाठी नवीन जागा निश्चित केल्या जात आहेत. ‘मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’ पालिका रुग्णालयांत सुरू करून सिझेरियन, डोळे, हाड, इतर आजारांच्या शस्त्रक्रिया खासगी डॉक्टर येऊन करू शकतील असे नियोजन केले आहे.

 

’ स्मार्ट सिटीची कोणती कामे सुरू केली आहेत?

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी २० ठिकाणी अत्याधुनिक वाहतूक सिग्नल  बसवले जात आहेत. या सिग्नलमधील कॅमेरे बेशिस्त वाहनचालकांच्या वाहनांचे क्रमांक टिपतील. त्याचे ई चलन तयार होऊन ते वाहतूक विभागाकडे जाईल. या माध्यमातून वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर नियंत्रण आणता येईल.  या सुविधेचा योग्य वापर होण्यासाठी वाहतूक पोलिसांना तांत्रिक प्रशिक्षण दिल जातय. सिटी पार्कचे काम पूर्णत्वाकडे चालले आहे. एकूण वापराच्या ५० टक्के वीज देयकात बचत करणारे ३० हजार एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू आहेत. याखेरीज दुर्गाडीजवळ खाडीकिनारा विकास प्रकल्प (रिव्हर फ्रंट) राबवण्यात येणार आहे. तेथे प्राचीन युगापासून ते आतापर्यंतच्या आरमारांमध्ये झालेल्या बदलांचे दर्शन घडवणारे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. आंबिवलीजवळ नवीन उड्डाणपूल प्रस्तावित आहे. विकास आराखड्यातील महत्त्वाचे रस्ते एमएमआरडीएकडून हाती घेतले जाणार आहेत. २७ मुख्य रस्त्यांच्या वाहतूक बेट, कोपरे, कारंजे, दुभाजकांच्या सौंदर्यीकरणाचे काम केले जाणार आहे. फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन अशाप्रकारची १० मैदाने विकसित केली जाणार आहेत.

’ पालिकेच्या जुन्या मालमत्तांचा विकास प्रस्तावित आहे?

डोंबिवली विभागीय कार्यालय धोकादायक असल्याने तेथील दोन्ही प्रभाग कार्यालये अन्यत्र हलविण्यात येतील. या इमारतीच्या विकासाचे यापूर्वी प्रस्ताव झाले आहेत. त्याचे अवलोकन करून योग्य निर्णय घेतले जातील. सूतिकागृहाचा विकास केला जाणार आहे.

 

’ नागरी सुविधांचे कोणते प्रकल्प सुरू आहेत?

अमृत योजनेतील मल जोडण्या व इतर ८५ टक्के काम पूर्ण झाली आहेत. पाणीपुरवठा योजनेचे उन्नतीकरण केले जाणार आहे. गाळेगाव, मोहने येथे सांडपाणी थेट खाडीत जाऊन जैवविविधतेला धोका निर्माण होतो. या ठिकाणी बंधारे बांधून त्या पाण्यावर प्रक्रिया करून मग ते पाणी खाडीत सोडले जाईल. शहरातील ३२ ठिकाणाहून सांडपाणी खाडीत जात आहे. त्या ठिकाणी जलप्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना केली जाणार आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाचा पालिका आणि रेल्वेच्या समन्वयातून विकास केला जाणार आहे. ‘एकत्रित वाहतूक व्यवस्थापन’ योजनेतून केडीएमटी बसची वेळ, ऑनलाइन तिकीट, थांब्यावरील वेळ प्रवाशांना घरून कळेल याचे नियोजन आहे. कडोंमपा उपयोजनातून (अ‍ॅप) सर्व नागरी सुविधांचा लाभ घरबसल्या घेता येईल अशा पद्धतीने विकसित केले जातय. नागरी सुविधा केंद्रांचे नूतनीकरण केले जाणार आहे.

 

’ पालिका हद्दीतील टेकड्यांच्या विकासाचे काही नियोजन आहे?

निसर्गसंपन्न टेकड्या शहरांची फुफ्फसे आहेत. नागरीकरणामुळे या संपदेचे जतन झाले पाहिजे. यासाठी आय नेचर फाऊंडेशनच्या माध्यमातून आंबिवलीजवळ ४० एकर जागेत जैवविविधता उद्यान विकसित केले जात आहे. फुलपाखरू उद्यान, पर्यटन, शालेय सहलींसाठी उपयुक्त असे हे ठिकाण असेल. पक्षी निरीक्षकांसाठी पाच मनोरे उभारले जाणार आहेत. विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे येथे अधिवास करतील अशी वनसंपदा फुलवली जात आहे. नेतिवली, भोपर, उंबार्ली टेकड्या अशाच पद्धतीने विकसित करता येतील का याचा विचार केला जात आहे.

’ कचरामुक्तीसाठी कोणते प्रकल्प प्रस्तावित आहेत?

शहरातील ८० टक्के कचऱ्याचे विलगीकरण होत आहे. ३६ सोेसायट्यांनी स्वत:चे कचरा विल्हेवाट प्रकल्प सुरू केले आहेत. त्या भागातील कचरा त्या भागात शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे नियोजन केले जात आहे. कल्याण, टिटवाळा, डोंबिवलीचा कचरा यापुढे त्या भागातील गृहप्रकल्प, कचरा प्रकल्पात शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल. त्यापासून खत, वीज, इंधन केले जाईल असे नियोजन आहे.

 

’ करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना कसा करणार?

पहिल्या, दुसऱ्या लाटेत मिळालेले धडे, राहिलेल्या त्रुटी तिसऱ्या लाटेसाठी दुरुस्त केल्या आहेत. एमआयडीसीत विभा कंपनीत ५२५ रुग्णशय्या सज्ज आहे. यातील १२५ रुग्णशय्या बालकांसाठी तयार करण्यात आल्या आहेत. प्राणवायू प्रकल्प उभारणी काम सुरू आहे.

लहान मुलांचे शिक्षक, शाळेविषयी असलेले प्रेम विचारात घेऊन शाळा विलगीकरण, काळजी केंद्रासाठी वापरण्यात येणार आहेत. माझा विद्यार्थी-माझी जबाबदारी या उपक्रमात शिक्षक, मुख्याध्यापक यांना सहभागी करून घेतले जाईल. आर्ट गॅलरीमध्ये बालकांसाठी १०० खाटा, शास्त्रीनगर, रुक्मिणीबाईमध्ये तशी सुविधा करण्याचे नियोजन आहे. उपचाराधीन लहान मुलांना १० दिवसाच्या कालावधीत कोणते भोजन, खाऊ द्यावा यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेतलाय. उपचारी लहान मुलांसाठी कसा संवाद साधावा, मनोरंजन, तेथील तंत्र सुविधेचा वापर यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

संकलन – भगवान मंडलिक