सपना कोळी-देवनपल्ली, शहर अभियंता, कल्याण-डोंबिवली महापालिका

कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना गेल्या काही महिन्यांपासून शहरात विकास कामांचा धडाका सुरू आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांना आता गती मिळू लागली आहे, तर काही प्रकल्प नव्याने हाती घेतले जात आहेत. नियोजनाच्या आघाडीवर अत्यंत ढिसाळ समजल्या जाणाऱ्या या शहरांना नवे रस्ते, उड्डाणपूल मिळू लागले आहेत. याविषयी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांच्याशी साधलेला संवाद.

’ कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत पालिकेसह इतर प्राधिकरणांचे एकूण किती लांबीचे रस्ते आहेत?

पालिका हद्दीत एकूण ४४० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. ३७५ किलोमीटर रस्ते डांबरीकरणाचे आहेत. एमआयडीसीचे ३० किमी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे ६ किमीचे रस्ते आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळ अंतर्गत भिवंडी-शिळ १२ किमी रस्ता आहे.

’ रस्त्यांची सद्य:स्थिती काय आहे?

यावर्षी कडोंमपा हद्दीत २६९० मिमी पाऊस पडला. सप्टेंबरमध्ये २४३ मिमी पाऊस पडला. जुलैपासून पाऊस सुरू झाल्यानंतर खड्डे पडले की ते भरण्यात येत होते. पावसाची संततधार होती. वाहनांच्या वर्दळीमुळे भरलेले खड्डे उखडून जायचे. पावसात डांबरीकरण केले की खडी, डांबर, रस्त्याचे सम्मिलीकरण होत नव्हते. दसऱ्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने रात्रंदिवस रस्ते देखभालीची कामे सुरू आहेत. ४८ हून अधिक रस्त्यांची डांबरीकरण कामे पूर्ण केली आहेत.

’ खड्डे तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. त्याचा प्रतिसाद काय आहे?

रहिवाशांना घर परिसरातील खड्ड्यांच्या तक्रारींसाठी १८००२३३००४५ टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला. मागील १५ दिवसांत या क्रमांकावरून ३०० खड्ड्यांच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या. त्याची दखल घेऊन त्या भागातील खड्डे बजुवण्याची कामे पूर्ण केली. घरडा सर्कल, मानपाडा साईबाबा मंदिर ते सागाव रस्ता, टाटा नाका, घरडा सर्कल, गांधारे पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. या रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात प्राधिकरणांना कळविले आहे. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसी, पालिकेच्या सहकार्याने रस्तेकाम सुरू आहे.

कल्याण, डोंबिवली शहरांतर्गत वाहतुकीत सुसूत्रता येण्यासाठी पालिकेचे नियोजन काय आहे?

वडवली, पत्रीपुलांची कामे पूर्ण झाली आहेत. मोहने, पत्रीपूल भागातील कोंडीचा प्रश्न सुटला आहे. येत्या काळातील वाढती वाहन संख्या, माणकोली पूल सुरू झाल्यानंतर डोंबिवलीतील वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता असावी म्हणून कोपर पुलाच्या बाजूला वाढीव पूल बांधता येईल का यासाठी सल्लागार नियुक्त केला आहे. सल्लागाराच्या अहवालानंतर पालिका, रेल्वेच्या समन्वयाने या पुलाविषयी निर्णय होईल. कल्याण पूर्व-पश्चिमेत वाहतुकीत सुसत्रता असावी म्हणून भवानी चौक ते विठ्ठलवाडी पूर्व उड्डाण पुलाचा विचार आहे. या पुलाचा सुसाध्यता अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त केला आहे. दोन रेल्वे फाटके या मार्गिकेत आहेत.

’ टिटवाळा शहरासाठी पुलाचे नियोजन आहे का?

मांडा-टिटवाळा येथील रहिवाशांना रेल्वे फाटकातून ये-जा करावी लागते. यासाठी काही वर्षापूर्वी मांडा-टिटवाळा पूर्व-पश्चिम भागात येजा करण्यासाठी पालिकेने पुलाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. तांत्रिक अडचणींमुळे हे काम थांबले होते. टिटवाळा रेल्वे फाटकाच्या बाजूला पालिका, रेल्वेच्या सहकार्याने १५ दिवसांपासून नवीन उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू होत आहे.

’ विकास आराखड्यातील रस्त्यांचा विकास केला जाणार आहे का?

मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाने गेल्या महिन्यात कडोंमपा हद्दीत ३१ रस्ते कामे करण्याचा निर्णय घेतला. काँक्रीटीकरणांच्या या कामांसाठी ३६० कोटी ६४ लाखाचा निधी मंजूर केला आहे. यामधील २८ कोटी ५९ लाखाची सात कामे पालिका करणार आहे. उर्वरित कामे ‘एमएमआरडीए’ करणार आहे. यामधील बहुतांशी रस्ते विकास आराखड्यातील आहेत. पालिकेचा प्रस्ताव प्राधिकरणाने मंजूर केला की तात्काळ सात रस्ते कामे सुरू केली जातील. ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौक उन्नत मार्ग, मोठागाव-कोपर रस्ता, उल्हासनगर व्हीनस चौक ते श्रीराम चौक, कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्ता ते पूर्वेतील पूना लिंक रस्ता यांना जोडणारा वालधुनी नदीस समांतर डी.पी.मधील २४ मीटर रुंदीचा रस्ता दोन पुलांसह विकसित केला जाणार आहे.

’ वळणरस्ते कामाची सद्य:स्थिती काय आहे?

एमएमआरडीएकडून सुरू असलेल्या वळणरस्ते कामांचा दुर्गाडी, वाडेघर, अटाळी, आंबिवली, टिटवाळा टप्पा ८० टक्के पूर्ण झाला आहे. पत्रीपूल-आधारवाडी, डोंबिवलीत गणेशनगर-मोठागाव ही कामे सुरू आहेत. भूसंपादनाप्रमाणे ही कामे प्राधिकरणाकडून सुरू आहेत.

’ नागरीकरणाच्या तुलनेत स्मशानभूमींची संख्या अपुरी आहे. प्रशासनाचे नियोजन काय आहे?

डोंबिवली, कल्याणच्या परीघ क्षेत्रात नागरी वस्ती वाढली आहे. या भागात स्मशानभूमी नसल्याने नवीन वस्तीमधील रहिवाशांना शहरांतर्गत स्मशानभूमीत पार्थिव दहनासाठी आणवे लागतात. ही ओढाताण विचारात घेऊन नवीन वस्ती भागात डोंबिवलीत कोळे, भोपर, संदप, निळजे, दावडी, टिटवाळा नांदप-घोटसई, वडवली-काळू नदी, मुरबाड रस्ता येथे आरसीसी पद्धतीची स्मशानभूमी, डोंबिवलीत कुंभारखाणपाडा, शिवमंदिर येथे नवीन गॅसदाहिन्या कामे प्रस्तावित, कल्याणमध्ये प्रेम ऑटोसमोरील गॅसदाहिनी सुरू केली आहे.

’ खड्डे नियंत्रणासाठी प्रशासनाचे नियोजन आहे का?

घरडा, खडकपाडा वर्तुळ, बंदिश चौक, ठाकुर्ली पूल, वाहतूक बेटे अशा ठिकाणी मास्टेक अस्फाल्ट तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान महागडे आहे. या वर्दळींच्या रस्त्यावर किमान तीन वर्षे खड्डे पडणार नाहीत.

’ शहर सुशोभीकरणासाठी नवीन प्रस्ताव आहेत?

कल्याण, डोंबिवली शहरांतील प्रवेशद्वारे, अंतर्गत रस्ते सुशोभित असले पाहिजेत म्हणून ‘एमसीएचआय’ विकास संघटनेच्या माध्यमातून रस्ते, दुभाजक, चौक सुशोभीकरणाची कामे हाती घेतली आहेत. पर्यटन स्थळ म्हणून आंबिवलीजवळ जैवविविधता वनराई विकसित केली जात आहे. स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत.  – भगवान मंडलिक