सार्वजनिक ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी कानात हेडफोन घालून दांडिया

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सार्वजनिक उत्सवांमधील ध्वनिप्रदूषण हा सामाजिकदृष्टय़ा चिंतेचा विषय ठरल्याने आवाजाची तीव्रता आणि वेळेबाबत न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने बरेच र्निबध घातले आहेत. त्याचा परिणाम यंदाच्या नवरात्रोत्सवातही दिसून येणार असून रात्री दहानंतर दांडियासाठी ध्वनिक्षेपक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत दांडिया खेळू इच्छिणाऱ्यांनी यातूनही एक नामी शक्कल काढली असून कानाला लावलेल्या वायरलेस हेडफोनमधून निनादणाऱ्या सुरांच्या तालावर ठाण्यात गरब्याचा फेर धरला जाणार आहे.

काही वर्षांपूर्वी नवरात्रोत्सवातील नऊ रात्री अनेक ठिकाणी मध्यरात्रीनंतरही दांडिया, गरब्याचा जल्लोश सुरू असे, मात्र न्यायालयाने रात्री दहानंतर ध्वनिक्षेपक लावण्यास तसेच वाद्ये वाजवण्यास मनाई केल्यानंतर अलीकडच्या काळात रात्री दहानंतर देवीसमोरील मंडपातही शुकशुकाट होतो. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत दांडिया खेळू इच्छिणाऱ्यांचा हिरमोड होतो. त्यातच अलीकडच्या काळात कामाच्या वेळा बदलत असल्याने नोकरदार तरुणांना घरी परतण्यासच रात्रीचे नऊ-दहा वाजतात. अशा तरुण-तरुणींना दांडियाला मुकावे लागते. या पाश्र्वभूमीवर आता चक्क कानात हेडफोन घालून उशिरापर्यंत दांडिया खेळण्याचा मार्ग अवलंबला जात आहे.

हेडफोनद्वारे गाणे थेट कानात वाजविण्याची शक्कल यंदा कोरम मॉलने काढली आहे. त्याला त्यांनी ‘सायलेंट नॉइस दांडिया’ असे नाव दिले आहे. या नृत्यासाठी इच्छुकांना आपापले हेडफोन आणावे लागणार आहेत. एकाच वेळी तीनशेहून अधिक व्यक्तींना त्याचा लाभ घेता येणार आहे. येत्या ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी रात्री ७ ते ९ या वेळेत कोरम मॉलच्या प्रांगणात हा आधुनिक दांडिया होणार आहे. अर्थात, वायरलेस हेडफोन असणाऱ्यांनाच या दांडियात भाग घेता येणार आहे.

डॉक्टरांचा इशारा

ध्वनिप्रदूषणावर उपाय म्हणून ‘सायलेंट नॉइस दांडिया’ हा एक उत्तम पर्याय ठरू  शकेल. मात्र हेडफोन लावून दांडिया खेळताना इतरांना त्रास होत नसला तरी आपल्या कानांची काळजी घेणे गरजेचे आहे, असे ठाण्यातील कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. प्रदीप उप्पल यांनी म्हटले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wireless headphones will use for garba dance
First published on: 27-09-2016 at 01:07 IST